रिंगरोडबाधितांचे आंदोलन पोलिस बळावर चिरडले!

0

पिंपरी-चिंचवड : आपल्या हक्काची घरे वाचवा अशी मुख्यमंत्र्यांनाकडे आर्त हाक मारणार्‍या रिंगरोडबाधितांचे आंदोलन पोलिस बळावर चिरडले गेले. मुख्यमंत्र्यांना भेटून न दिल्यामुळे आंदोलकांनी प्रवेशद्वार अडवले. मात्र, चकवा देऊन मुख्यमंत्र्यांचा ताफा नो एंट्रीतून स्वार झाल्याने आंदोलकांचा उद्रेक झाला. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये एक आंदोलक महिला गंभीर जखमी झाली आहे.

भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात महापालिकेच्या विविध विकास कामांच्या ’ई’ उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्यांना भेटण्यासाठी रिंगरोडबाधित नागरिकांनी शनिवारी सकाळीपासून नाट्यगृहासमोर गर्दी केली होती. पोलिसांनी नागरिकांना एका मंगल कार्यालयात डांबून ठेवले. त्यावेळी रिंगरोड बाधितांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांना भेटून दिले जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले होते. त्यामुळे नागरिक दिवसभर शांत बसून राहिले होते. सव्वा पाचच्या सुमारास मुख्यमंत्र्याच्या ताफा जाण्याच्या तयारीत होता. तरीही, शिष्टमंडळाला भेटून दिले नाही. त्यामुळे संतप्त जमावाने प्रवेशद्वार रोखून धरले. त्यानंतर काही जणांना आतमध्ये सोडले. मात्र, शिष्टमंडळाला न भेटताच मुख्यमंत्र्यांचा ताफा विरुद्ध बाजूने नो एंट्रीतून जमावाला चुकवून निघून गेल्याची भावना आंदोलकांची झाली. यामुळे रिंगरोडबाधित नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या व भाजपाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला.