रिंगरोडवर लढाऊ विमानांचे ‘लँडिंग’

0

पुणे । पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) रिंगरोड करण्यात येणार आहे. या मार्गावर आपत्कालीन परिस्थितीमध्ये लढाऊ विमाने उतरविता येईल, अशी तीन ठिकाणे प्राधिकरणाकडून केली जाणार आहे. त्यामुळे हवाई दलाला युध्दजन्य परिस्थितीमध्ये रिंगरोडचा वापर करता येणार आहे.शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधिकरणाने रिंगरोड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा रिंगरोड 128 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा असणार आहे. हा रिंगरोड तयार करताना त्यावर अत्याधुनिक सोयी सुविधा या उपलब्ध करून देण्याचा पीएमआरडीएचा मानस आहे.

नविन महामार्ग बांधताना लढाऊ विमाने उतरण्यास पूरक असतील, असे महामार्ग बांधण्यासाठी केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासाठीचे प्रस्ताव माझ्याकडे पाठवा, संरक्षण विभागाशी चर्चा करू,’ असे सांगितले होते. यासर्व पार्श्‍वभूमीवर पीएमआरडीए’कडून याची दखल घेण्यात आली असून रिंगरोडवर विमाने उतरू शकतील, असा महामार्ग बनविण्यात येणार आहे. विमाने उतरू शकतील अशी तीन ठिकाणे रिंगरोडवर निश्‍चित केली जाणार आहे.

याविषयी माहिती देताना प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते म्हणाले, आत्पकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या रस्त्यावर तीन ठिकाणी विमानदेखील उतरविता येईल, अशी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. मध्यंतरी दिल्ली ते आग्रा या दरम्यान विकसित करण्यात आलेल्या महामार्गावर हा प्रयोग करण्यात आला होता. त्याच धर्तीवर पीएमआरडीए’ च्या रिंगरोडवर ही सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.