रिंगरोडसाठी ‘पीएमआरडीए’ घेणार कर्ज

0

पुणे । पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (पीएमआरडीए) विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने रिंगरोडचा समावेश आहे. या रिंगरोडसाठी पीएमआरडीए स्वत:चे फंड तयार करणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी पीएमआरडीएने एक हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएने रिंगरोड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. रिंगरोडमुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पीएमआरडीए प्रयत्नशील आहे. त्यासाठी टीपी स्कीम मॉडेल राबविण्यात येणार आहे. मात्र ज्या ठिकाणी टीपी स्कीम करता येणार नाही, अशा ठिकाणी जमिन मालकांना विविध विकल्प उपलब्ध करून जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी प्राधिकरण स्वत: निधी तयार करणार आहे. यासाठी अन्य मोठ्या वित्तीय संस्था किंवा कर्जरोखे या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे.

जायकाकडून घेणार 8 हजार 700 कोटींचे कर्ज
रिंग रोड हा सुमारे 123 किमी लांबीचा असणार आहे. यासाठी सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या डीपीआरनुसार जमिनीची किंमत वगळता या प्रकल्पासाठी सुमारे 13 हजार 315 कोटींचा खर्च अपेक्षीत आहे. यातील 8 हजार 700 कोटी रुपयांचे कर्ज जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून (जायका) घेण्यात येणार आहे. कर्ज मंजूर होण्यासाठी तसेच कर्जरोखे माध्यमातून निधी उभारण्यासाठी पीएमआरडीएचे क्रेडीट रेटींग केले जाणार आहे.

वर्षभरासाठी 500 कोटी
सध्यस्थितीत अनेक मोठ्या वित्तीय संस्था भारतात गुंतवणूक करण्यास तयार आहे. ज्या संस्थांनी शासनाच्या नियम व अटी मान्य केल्या आहेत. त्या संस्थांकडून निधी मिळणार आहे. त्यामुळे कर्ज देण्यासाठी अनेक संस्थांचे पर्याय प्राधिकरणाकडे उपलब्ध असणार आहे. यापूर्वी महानगरपालिका, सिडको, अन्य प्राधिकरणे यांना बॉण्ड उभारण्यास शासनाने परवानगी दिली आहे. पीएमआरडीए पहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली हा सुमारे 33 कि.मी या रस्ता केला जाणार आहे. सुरुवातीस यासाठी 400 ते 500 कोटी रुपये एक वर्ष काम करण्यास पुरतील. कर्ज मिळेपर्यंत रस्त्याचे काम थांबणार नाही, यासाठीचे नियोजन प्राधिकरणाने केले आहे. दिर्घ कालीन वित्तीय पुरवठा करण्यासाठी बँका आणि कर्जरोखे या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे.

क्रेडीट रेटींगसाठी आयसीआरएची नेमणूक
क्रेडीट रेटींग करण्यासाठी इन्व्हेसमेंट इनफॉरमेशन ऍन्ड क्रेडीट रेटींग एजन्सीची (आयसीआरए) नेमणूक केली आहे. ही एजन्सी प्राधिकरणाचे उत्पन्न, खर्च, प्रकल्प कोणते, कर्जाची परतफेड होईल का? वित्तीय संस्थांना कर्ज देणे किती सुरक्षित आहे. या सर्व बाबींचा अभ्यास एजन्सी करणार असून त्याबाबी क्रेडीट रेटींगसाठीच्या अहवालात नमूद केल्या जाणार आहेत. प्राधिकरणाने क्रेडीट रेटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रेडीट रेटींग करण्यासाठी इन्व्हेसमेंट इनफॉरमेशन ऍन्ड क्रेडीट रेटींग एजन्सीची (आयसीआरए) या एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठीचा सर्वंकष अहवाल ही कंपनी करेल. साधारणे दोन महिन्यात ही प्रकिया पूर्ण होईल. प्राधिकरणाचे क्रेडीट रेंटींग झाल्यास मोठ्या वित्तीय संस्था कर्ज आणि कर्जरोखे उपलब्ध होण्यास मदत होईल. जमिन हे प्राधिकरणाचे मुख्य भांडवल आहे. पीएमआरडीएला चांगले रेटींग राहिल. ए प्लस रेटींग मिळेल, असा विश्‍वास पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी व्यक्त केला.