पिंपरी-चिंचवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भोसरी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात रिंगरोड बाधित नागरिकांचा उद्रेक झाला. भोसरी मतदार संघातील कार्यक्रमात गोंधळ झाल्यामुळे त्याचे खापर आता आमदार महेश लांडगे यांच्यावर फुटण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील रिंगरोड बाधितांच्या रोषालाही आमदार लांडगे यांना समोरे जावे लागणार आहे.
…लांडगे फेल झाले
महापालिकेत पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता आली. सत्ता येऊन पाच महिन्याचा काळ उलटून गेला आहे. सत्ता आल्यानंतर विकास कामाचे उद्घाटन, भूमिपूजन या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात आले. त्यावेळी रिंगरोड बाधित नागरिकांचे ‘विघ्न’ येणार याची जाणीव शहर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना होती. त्यामुळे शहर पातळीवर विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम भोसरीमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले. कारण, रिंगरोड बाधित नागरिकांनी आंदोलन केलेच, तर त्याची जबाबदारी लांडगे यांची राहणार होती. कार्यक्रमाची तयारी जय्यत करण्यात आली होती. मात्र, रिंगरोड बाधितांनी रास्ता रोको आणि मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे कार्यक्रम ‘फेल’ झाला. प्रत्येक कार्यक्रमाचे अचूक ‘मॅनेजमेंट’ करुन भाजपचे प्रभावी ‘मार्केटिंग’ करण्यात तरबेज असलेल्या लांडगे यांना मुख्यमंत्र्यांसमोर अवघडल्यासारखे झाले. कारण, कार्यक्रम निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी भोसरीतील नगरसेवक आणि स्वत: आमदार लांडगे यांची होती.
मुख्यमंत्री दौर्याला गालबोट
यावेळी आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री येण्यापूर्वीच रिंगरोड बाधित नागरिकांना विश्वास दिला. ‘मी मुख्यमंत्र्यांची आणि तुमची भेट घडवून आणतो. आपण केवळ शांतता ठेवा. कार्यक्रम निर्विघ्न पार पाडण्यासाठी मदत करा’ यानंतर संबंधित नागरिकांच्या शिष्टमंडळाला एका कार्यालयात थांबविण्यात आले. लांडगे यांच्या शब्दावर विश्वास नागरिकांनी ठेवला. पण, ऐनवेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे भोसरीतील ‘त्या’ कार्यक्रमाला गालबोट लागले.