रिंगरोड बाधितांची शुक्रवारी ‘स्मरण पदयात्रा’

0

पिंपरी-चिंचवड : आपली हक्काची घरे वाचविण्यासाठी रिंगरोड बाधित नागरिक गेल्या एक महिन्यापासून विविध मार्गाने आंदोलन करत आहेत. आंदोलनादरम्यान प्राधिकरण, पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनांचे त्यांना ’स्मरण’ करून देण्यासाठी रिंगरोड बाधित शुक्रवारी प्राधिकरण कार्यालयावर ’स्मरण पदयात्रा’ काढणार आहेत. वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी चौकातून शुक्रवारी सकाळी दहाला पदयात्रेला सुरुवात होणार आहे. निगडी येथील पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात ही स्मरण यात्रा पोहोचणार आहे.

आंदोलनाचे 50 दिवस
महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार 30 मीटर रुंद एचसीएमटीआरचा 65 टक्के जागेचा ताबा असून उर्वरीत जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, या कारवाईला रिंगरोड बाधित नागरिक आणि ’घरे वाचवा संघर्ष समितीने तीव्र’ विरोध केला आहे. एचसीएमटीआरचा रस्ता दाट लोकवस्तीतून न नेता, पर्यायी मार्गाने वळवावा, कालबाह्य रिंगरोड रद्द करावा, याकरिता ’घर बचाव संघर्ष समिती’ रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. त्यांच्या आंदोलनाला 50 दिवस उलटून गेले आहेत.

नागरिकांनी सहभागी व्हावे
सभा, मोर्चा, चिंतन पदयात्रा, लाक्षणिक उपोषण, पोस्टकार्ड पाठवा, प्रबोधन अशा विविध मार्गाने नागरिकांनी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान प्राधिकरण, पालिकेच्या अधिका-यांनी विविध आश्वासने दिली होती. या आश्वासनाची त्यांना आठवण करून देण्यासाठी ’स्मरण पदयात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेत रिंगरोड बाधित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.