रिंगरोड बाधितांचे रविवारी चिंचवडमध्ये ’जागरण शंभरी’ आंदोलन!

0

बिजलीनगरातील तुळजाभवानी मंदिरात होईल आंदोलन व बैठक

पिंपरी-चिंचवड : वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळे गुरव या दाट लोकवस्ती परिसरातून जाणार्‍या प्रस्तावित रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. आपली हक्काची घरे वाचविण्यासाठी रिंगरोड बाधित नागरिक गेल्या तीन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत. सभा, मोर्चा, चिंतन पदयात्रा, लाक्षणिक उपोषण, पोस्टकार्ड पाठवा, स्मरण पदयात्रा, प्रबोधन अशा विविध मार्गाने नागरिकांचा लढा सुरू आहे. या लढ्याला आता 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने चिंचवड येथे ’जागरण शंभरी’ आंदोलन आणि आढावा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड, बिजलीनगर येथील तुळजाभवानी मंदिरात रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता हे जागरण शंभरी आंदोलन आणि आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत गेल्या 100 दिवसात केलेल्या कार्याच्या आढावा घेण्यात येणार आहे.

हजारो नागरिकांच्या घरांचा प्रश्‍न
महापालिका आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार 30 मीटर रुंद एचसीएमटीआरचा 65 टक्के जागेचा ताबा असून, उर्वरित जागा ताब्यात घेण्याबाबत महापालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळे गुरव परिसरातील हजारो नागरिक बेघर होणार आहेत. या कारवाईला विरोध करत रिंगरोड बाधित नागरिक सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत. शनिवारी त्यांच्या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण होत आहेत.

अद्यापही दखल नाहीच
सभा, मोर्चा, चिंतन पदयात्रा, लाक्षणिक उपोषण, पोस्टकार्ड पाठवा, स्मरण पदयात्रा, प्रबोधन अशा विविध मार्गाने रिंगरोड बाधित नागरिक आंदोलन करत आहेत. प्रस्तावित रिंगरोड दाट वस्तीतून न देता पर्यायी मार्गाने वळविण्यासाठी घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचीदेखील भेट घेतली होती. मात्र, रिंगरोड बाधित नागरिकांच्या मागणीची, त्यांच्या आंदोलनाची अद्यापर्यंत सरकारने कोणतीही दखल घेतली नाही.

पुढील आंदोलनाची दिशा ठरणार
चिंचवडमध्ये रविवारी ’जागरण शंभरी’ आंदोलन आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत आतापर्यंत केलेल्या कायदेशीर, घटना व सनदशीर मार्गाद्वारे केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक विजय पाटील यांनी दिली. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने प्रशासनाला जाग यावी आणि प्रशासनाने रिंगरोडच्या घरांचा प्रश्न सोडवावा, असेही विजय पाटील म्हणाले.