रिंगरोड बाधितांवर सौम्य लाठीमार

0

पिंपरी-चिंचवड । रिंगरोडबाधित नागरिकांना न भेटताच मुख्यमंत्र्यांचा ताफा निघून गेल्याने संतप्त झालेल्या रिंगरोडबाधित नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग अडवून रास्तारोको केला. या नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झाले. हा कार्यक्रम शनिवारी दुपारी तीनला भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होता. त्यांना भेटण्यासाठी रिंगरोडबाधित नागरिकांनी नाट्यगृहासमोरील एका कार्यालयात मोठी गर्दी केली होती.

महिन्यापासून आंदोलन
काका आमचा निवारा तोडू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे घर पाडू नका, हिरावून घेऊ नका आमची घरे, आता फक्त एकच ध्यास, संरक्षित करूया आपला निवास, आता फक्त एकच नारा, तोडू नका आमचा निवारा, असा मजकूर लिहिलेले फलक हातात घेवून आपल्या शाळकरी मुलांसह रिंगरोड बाधित नागरिकांनी शुक्रवारी सकाळी प्राधिकरण कार्यालयावर स्मरण पदयात्रा काढली होती. गेले महिनाभर विविध प्रकारे हे नागरिक आंदोलन करत आहेत.

मुख्यमंत्री भेटलेच नाहीत
सकाळपासून कार्यक्रमस्थळी बसलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री आपल्याला भेटतील अशी अपेक्षा होती. मात्र, उद्घाटनासाठी मुख्यमंत्री वाहनांच्या ताफ्यातून थेट व्यासपीठाकडेच गेले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला. पोलिसांनी त्यांना अडविले. मात्र, वातावरण अधिक संतप्त झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करून आंदोलनकर्त्यांना पळवून लावले.

मोठा पोेलिस बंदोबस्त
विविध विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजनासाठी मुख्यमंत्री शनिवारी येणार होते. त्यामुळे हे नागरिक सकाळपासून कार्यक्रमस्थळाबाहेरील जागेवर बसून होते. दरम्यान, त्यांच्याकडून मोठा गोंधळ होण्याचा गुप्त अहवाल मिळाल्याने याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त होता. तसेच झालाच गोंधळ तर धरपकड करण्यासाठी साध्या वेशातील पोलिसही होते. आंदोलनकर्त्यांमध्ये महिला अधिक असल्याने महिला पोलिस त्यांच्यातच बसून होत्या.