घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली महापौरांची भेट
पिंपरी-चिंचवड : रिंगरोड बाधितांविषयी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन घर बचाव संघर्ष समितीने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा महापालिकेने गठीत केलेल्या समिती अहवालामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने महापौर नितीन काळजे व अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे केली. समितीच्या शिष्टमंडळाने महापौर व अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
लेखी निवेदन दिले
महापालिका सभेत गठीत केलेल्या सर्वपक्षीय समितीविषयी महापौर नितीन काळजे व अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. रिंगरोड बाधितांविषयी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन समितीने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा समिती अहवालामध्ये समावेश करावा, अशा मागणीचे लेखी निवेदन शिष्टमंडळाने दिले आहे. रि-अलायमेन्ट अहवाल महापालिकेने महापौरांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय समितीने स्वीकारावा, असे समितीच्या वतीने समन्वयक विजय पाटील, रेखा भोळे, रजनी पाटील, शिवाजी इबितदार, नारायण चिघळीकर यांनी सांगितले.
नागरिकांची बाजू विचारात घेऊ
पर्यायी मार्ग सुकर आहे. रिंगरोड बाधित नागरिकांची बाजू महापालिका समिती नक्कीच विचारात घेईल, असे आश्वासान अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, रिंगरोड बाधितांची घरे वाचविण्यासाठी घर बचाव संघर्ष समितीचा लढा सुरूच आहे. महापालिका प्रशासन व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अजूनही ठोस भूमिका घेत नसल्याने रिंगरोड बाधितांमध्ये प्रचंड नाराजी आहे.