पिंपरी-चिंचवड : महापालिकेने काढलेल्या रस्ते विकास कामाच्या पाच निविदांमध्ये रिंग झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या निविदा रद्द करुन फेरनिविदा करण्यात याव्यात, अशी शिफारस स्थायी समितीने आयुक्तांकडे केली आहे. समिती साप्ताहिक सभा मंगळवारी पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या. विषयपत्रिकेवरील 33 विषय मंजूर करण्यात आले. तर, 22 विषय तहकूब करण्यात आले. एक विषय फेटाळला असून एक प्रशासनाने मागे घेतला आहे.
कामठे, कलाटेंची होती तक्रार
सभेची माहिती देताना सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, रस्ते विकासाच्या दहा निविदांमध्ये ’रिंग’ होणार असून दोनच ठेकेदांराना कामे मिळणार असल्याची तक्रार भाजपचे नगरसेवक तुषार कामठे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी केली होती. त्यानुसार पाच कामे आजवानी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा. लि यांना चार कामे आणि एक काम कृष्णाई इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा. लि यांना मिळाल्याची आपल्याकडे माहिती आहे. प्रभाग क्रमांक 16 रावेत येथील डीपी रस्ता विकसित करणे (23 कोटी 3 लाख), मुकाई चौक ते समीर लॉन्सपर्यंतचा रस्ता विकसित करणे (22 कोटी 69 लाख)गहुंजे बॉर्डर ते लेखाफार्म 12 मीटर सर्व्हिस रस्ता विकसित करणे (21 कोटी 75 लाख)प्रभाग क्रमांक 25 वाकडगावठाण रस्ता विकसित करणे (14 कोटी 39 लाख)ही चार कामे आजवानी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा. लि यांना आणि प्रभाग क्रमांक 25 भुजबळ वस्ती ते भुमकर वस्ती 30 मीटर डीपी रस्ता विकसित करणे (23.69 लाख) हे काम कृष्णाई इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा. लि यांना मिळाले असल्याची आपल्याकडे माहिती आली आहे.
तर ठेकेदारांवर कारवाई करा
या दोघांना ही कामे मिळाल्याच्या आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. फौजदारी करावी. समिती नेमून चौकशी करण्यात यावी. चौकशीपुर्ण होईपर्यंत त्यांना कोणतेही काम देण्यात येऊ नये. रिंग झालेल्या पाच निविदा रद्द करुन फेरनिविदा करण्यात यावी, अशी शिफारस स्थायी समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली असल्याचे, मडिगेरी यांनी सांगितले.