चौघांवर दिघी ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड : अज्ञात कारणावरुन चार जणांनी एका रिअल इस्टेटचा व्यवसाय करणार्या इसमावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना दिघी येथे घडली. गणेश अंताराम गंगणे (वय 40, रा. दत्तनगर, दिघी) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.9) मध्यरात्री सव्वााच्या सुमारास दिघी येथील दत्तमंदीरा जवळ घडली. याप्रकरणी गणेश यांचा भाऊ सुरेश यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरविंद वंजारी (रा. दिघी), तुषार (पूर्ण नाव माहित नाही), प्रमोद शेलार (रा. दिघी), निलेश कुदळे (रा. वडमुखवाडी) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गंगणे हे रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. काल रात्री आरोपी आणि मयत हे सर्वजण न्यु मोहर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री सव्वाएकच्या सुमारास आरोपी अरविंद आणि त्याचे भाचे तुषार, प्रमोद आणि निलेश या चौघांनी गणेशच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन गणेश यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र कदम तपास करीत आहेत.