रिकाम्या तिजोरीचे राखणदार

0

जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी अंदाजपत्रकाच्या दीड पट नियोजन केले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वर्ष लागल्यापासून माजी सभागृहातील पदाधिकारी आणि सदस्यांनी निधी खर्च करण्याचा सपाटा लावला होता. यामुळे या वर्षीच्या अंदाजपत्रकामधून नियोजनातील विकास कामावर निधी खर्च होत असल्याने जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्यांसाठी विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध नाही. यामुळे पदाधिकारी केवळ रिकाम्या तिजोरीचे राखणदार राहिले आहेत.

निधी अभावी विकास कामांचे नियोजन करता येत नसल्याने, पदाधिकारी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरवत आहेत. माजी सभागृहाने आपल्या गटातील मतदारांना खुश ठेवण्यासाठी समाज कल्याण आणि महिला व बाल कल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या जवळपास 26 कोटींच्या निधीचे वर्गीकरण केले. तसेच बांधकाम, शिक्षण, स्थायी, कृषी, पशुसंवर्धन आदी समित्यांनीही आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व कामे मंजूर करून घेतली. नवीन सभागृह सदस्यांनी आलेला निधी सर्वच खर्च केल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे आपल्या गटात लोकांच्या अडीअडचणी समजून घेताना आश्‍वासने देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही.

जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये 2017-18 चा 168 कोटी 70 लाखांचा मूळ अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मात्र, माजी सभागृहाने कामाचे दीडपट नियोजन केल होते. यामुळे या अर्थसंकल्पातील जवळपास 100 कोटीपेक्षा अधिक मागचे देणे आहे. यामुळे विद्यमान सदस्यांना विकास कामांचे नियोजन करण्यासाठी फक्त 68 कोटी 70 लाख मिळणार आहेत. इतक्या कमी निधीत जिल्ह्यातील विकास कामांचे नियोजन कसे करायचे हा प्रश्‍न सदस्यांना भेडसावत असल्याने नवीन सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांकडे कोणतेही काम राहिले नाही. यामुळे विविध समितीच्या बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांमध्ये जुन्या विषयावर चर्चा होत आहे. या बैठकीमध्ये सदस्य गटातील विकास काम करण्याची सूचना करतात. पण निधी अभावी सूचना कागदावरच राहत आहेत.

माजी सभागृहाने महिला व बाल कल्याण विभागांतर्गत सौरकंदिल खरेदीसाठी 45 लाखांची तरतदू केली होती. यावर भाजपाचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत आवाज उठवत रक्कम खर्च न झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शाळांच्या दरुस्तीसाठी अतिरिक्त निधी अर्थसंकल्पामध्ये देण्यात यावा, अशी मागणी रणजीत शिवतरे, प्रमोद काकडे, वीरधवल जगदाळे, अभिजीत तांबिले आणि इंदापुर सभापती करणसिंह घोलप आदी सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली, अशा अनेक मागण्या नविन सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केल्या. नविन सदस्यांच्या निधी नसल्याने काहीच करता येत नाही, हे लक्षात आणल्याने जिल्हा परिषदेत फिरकणे दुर्मिळ झाले आहे.
– प्रदीप माळी