मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याची ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-20 संघाच्या सहप्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पाँटिंगची सहप्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. या संघाचा प्रमुख प्रशिक्षक माजी सलामीवीर जस्टिन लँगर असणार असून, जेसन गिलेस्पी सुद्ध सहप्रशिक्षक असणार आहे.
या मालिकेतील पहिला सामना 17 फेब्रुवारीला मेलबर्नला, दुसरा 20 फेब्रुवारीला गिलाँग येथे आणि तिसरा सामना 22 फेब्रुवारीला ऍडलेडला खेळविण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी ही मालिका खेळविण्यात येणार आहे. पाँटिंगने यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडलेली आहे. पाँटिंगच्या आक्रमकतेचा संघाला निश्चितपणे फायदा होणार आहे.