भुसावळ। भुसावळ नगरपालिका हि नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. मात्र कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे पालिकेतील कारभार सध्या प्रभारींच्या भरवशावर सुरु आहे. विकासात्मक प्रस्ताव आणि कामांचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पालिकेतील तब्बल 30 वरिष्ठ पातळीवरील कर्मचार्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळे शहरातील विकासाला खिळ बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही पदे तातडीने भरली जावीत, यासाठी भाजपच्या सत्ताधार्यांना तारेवरची कसरत करुन पाठपुरावा करावा लागत आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष रमण भोळे हे वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा देखील करीत आहे. त्यामुळे नगररचना विभागासह पाणीपुरवठा आणि विद्युत विभागात अभियंत्याचे पद भरण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली इतरही पदे भरण्यासाठी पदाधिकार्यांची कसोटी लागणार आहे.
पाणीपुरवठ्यातील श्रेणी ’अ’ ची पदे रिक्त
भुसावळ पालिकेत 39 सुपेरिअर कर्मचार्यांची पदे आहेत. मात्र यातील तब्बल 30 पदे सध्या रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. पालिकेकडे महाराष्ट्र नगरपालिका अभियांत्रिकी सेवेतील स्थापत्य विभागाचे नगरअभियंता स्थापत्य, नगरअभियंता (विद्युत), नगरअभियंता (संगणक), पर्यवेक्षकांच्या स्थापत्य, विद्युत आणि संगणक आदींच्या जागा रिक्त आहेत. यासह पाणीपुरवठा विभागातील श्रेणी ’अ’ ची पदे रिक्त आहेत.
या पदांचा आहे समावेश
महाराष्ट्र नागरपालिका लेखा परिक्षण सेवेमधील लेखा परिक्षक, लेखापाल, सहाय्यक लेखापाल, सहाय्यक लेखापरिक्षक, महाराष्ट्र नगरपालिका कर निर्धारण आणि प्रशासकिय सेवेमधील उपमुख्याधिकारी, कार्यालय अधीक्षक, कर निरीक्षक, खरेदी आणि भंडार पर्यवेक्षक, मिळकत व्यवस्थापक, सहाय्यक कार्यालय अधीक्षक, सहाय्यक कर निरीक्षक, सहायक समाजकल्याण, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी, अग्नीशमन अधिकारी, अग्नीशमन स्थानक पर्यवेक्षकांसह नगररचना विकास सेवेमधील नगरचनाकार, उपनगररचनाकार, रचना सहाय्यक आदींची पदे रिक्त आहेत.
या विभागात मिळाले कर्मचारी
पालिकेतील बहुतांश सर्वच महत्त्वाच्या विभागांत सुपेरिअर कर्मचारी नाहीत. कर्मचार्यांच्या रिक्त जागांवर अधिकारी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. यामुळे नगररचना, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागात अभियंते प्राप्त झाले. अजून उर्वरित जागांवरही अधिकारी, कर्मचारी मिळवून विकासाला चालना देणार देण्याचे काम होत आहे.
नऊ कर्मचार्यांची नियुक्ती
नगरपालिकेचे तांत्रिक पदांवरच अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आणि कामे मुदतीत पूर्ण होत नाहीत. यामुळे या योजनांचा निधी पडून राहतो. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने ही सर्व रिक्त पदे तातडीने भरली जाणे आवश्यक आहेत. रिक्त पदांच्या संदर्भात नगराध्यक्षांनी पालिका प्रशासन संचालनालयाला प्रस्ताव दिला आहे. यात संपूर्ण 39 तांत्रिक प्रशासकीय पदांवर केवळ नऊ कर्मचार्यांच्या नियुक्ती करण्यात आली असून उर्वरित 30 पदे रिक्त असल्याचे नमूद केले आहे.