जळगाव प्रतिनिधी । सर्व रिक्त पदे भरावीत यासह अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी एनमुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
प्राध्यापकांच्या न्याय मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने संघटनेने आंदोलनाचे टप्पे जाहीर केले आहेत, या अंतर्गत महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. यात शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यास शासनाने घातलेल्या बंदीवर विस्तृत चर्चा झाली होती. शासनाने ही बंदी उठवून सर्व रिक्त जागा कायमस्वरुपी तत्वाने भराव्यात. यासह परीक्षेच्या कामकाजावर घातलेल्या बहिष्कार दरम्यानचे थकीत वेतन अदा करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत महाविद्यालयांनी त्यांच्या व्यवस्थापनामार्फत सर्व कर्मचार्यांचे नवीन वेतन योजनेनुसार पगार करावेत, अशा मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र, यावर शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय सोनवणे, सरचिटणीस डॉ. बी. पी. सावखेडकर, प्रा. सुधीर पाटील, डॉ. सी. पी. सावंत यांनी केले. प्रा.डॉ. वाय. जी. महाजन यांच्यासह प्राध्यापकांनी यात सहभाग घेतला.