हेल्मेटच्या दर्जाबाबतही वाजिद खान यांचा अनोखा निषेध
पुणे : हेल्मेट सक्तीवरून पोलीस विरुद्ध सामान्य नागरिक असा संघर्ष सुरू झाला आहे. अनेकांनी रस्त्यावर उतरून, हातामध्ये फलक घेऊन आपला विरोध दर्शवला आहे. कृती समितीच्या नेत्यांनी गुरुवारी सविनय कायदेभंग करत रॅली काढली. यात सहभागी नेत्यांना इ-चलानद्वारे 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आता पुणेकरांनी सक्तीने हेल्मेट घालायचे की नाही यावर पोलीस व नागरिक वाद सुरू असतानाच हडपसर येथे राहणार्या एका वकिलाने चक्क डोक्यावर कढई घालून प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या वाजिद खान बीडकर हे वकील डोक्यावर कढई घालून दुचाकीवरून जाताना दिसत आहेत. मुळात बीडकर यांचा हेल्मेट सक्तीला विरोध नसून हेल्मेटच्या दर्जाबद्दलच त्यांना आक्षेप आहे. दर्जाहीन हेल्मेट वापरणार्यांवर पोलीस कारवाई करत नाहीत म्हणूनच मी डोक्यावर कढई घालून सध्या पुण्यामध्ये दुचाकीवरून प्रवास करतो असे बीडकर सांगतात. त्याचप्रमाणे हेल्मेट कसे असावे याबद्दल कोणतीही नियमावली नसल्याने डोक्याचे संरक्षण करण्यासाठी मला या कढईचा वापर हेल्मेट म्हणून करू द्यावा अशी लेखी मागणीच बीडकरांनी पोलिसांकडे केली आहे.
वाहतूक पोलिसांची किमया..
हेल्मेट न घातल्याबद्दल रिक्षाचालकांकडूनही दंड वसूल करण्याची किमया पुणे वाहतूक पोलिसांनी करून दाखवली आहे! पुण्यात हेल्मेटसक्ती न पाळणार्यांकडून मोठी दंडवसुली सुरू असल्याचे दाखवण्यासाठीच वाहतूक नियम मोडणार्या रिक्षाचालकांवर ‘हेल्मेटनियम तोडल्याचा’ ठपका ठेवत दंडवसुली सुरू असल्याची चर्चा त्यामुळे जोर धरत आहे.
हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकांना दंडआकारणीच्या पावत्या काही दिवसांपूर्वी पाठवल्या आहेत. याबाबत रिक्षा चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत शिवनेरी रिक्षा संघटनेकडून वाहतूक पोलीस प्रमुखांची भेट घेण्यात येणार आहे.
वाहतुकीचे नियम तोडणार्या वाहन चालकांना इ-चलानद्वारेही दंडाची आकारणी केली जाते. अशाच प्रकारचा तपशील असलेल्या पावत्या काही रिक्षा चालकांना मागील काही दिवसांत मिळाल्या असून, त्यावर कोणता नियम तोडल्याच्या रकान्यात ‘विदाउट हेल्मेट’ असा स्पष्ट उल्लेख आहे. एमएच 12 जेएस 2505, एमएच 12 जेएस 4388 या क्रमांकाच्या रिक्षा चालकांना अलीकडच्या काळात हेल्मेट दंडाच्या पावत्या पाठविण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर यांनी सांगितले.