पुणे । दिल्लीप्रमाणे शहरातही प्रदूषण वाढत आहे. याचा मोठा फटका रिक्षाचालकांना बसत आहे. सीएनजीच्या माध्यमातून एमएनजीएलसारख्या सरकारी कंपन्या प्रदूषण कमी करण्याकरीता हातभार लावत आहेत. परंतु सध्याच्या प्रदूषित वातावरणात रिक्षाचालकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरीता रिक्षाचालकांनी संतुलित आहार व योगा करणे गरजेचे आहे. ‘स्वस्थ सारथी’सारख्या शिबिरातून रिक्षाचालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणे हा स्तुत्य उपक्रम आहे, असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनतर्फे 3 हजार सीएनजी रिक्षाचालकांसाठी आयोजित ‘स्वस्थ सारथी’ या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन शिरोळे यांच्या हस्ते झाले. शिवाजीनगर येथील रमा-रमण कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला डॉ. बाबा आढाव, नितीन पवार, अरविंद तांबेकर, संतोष सोनटक्के, सुनील पांडे, डॉ. सचिन देशपांडे, डिंपल बुचे आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा 3 रे वर्ष आहे. डॉक्टर्स फाउंडेशन फॉर एन्शियंट इंडियन फिलॉसॉफी अॅन्ड मेडिसीन यांचे शिबिरासाठी सहाय्य मिळाले आहे.
अनुदानासाठी 4 हजार 500 अर्ज प्रलंबित
पवार म्हणाले, रिक्षाचालकांना सीएनजी किटकरीता महापालिकेकडून प्रत्येकी 12 हजार रुपयांचे अनुदान मिळते. अनेक रिक्षाचालक अजूनही या अनुदानाच्या प्रतिक्षेत असून सुमारे 4 हजार 500 अर्ज प्रलंबित आहेत. प्रदूषण विरहित पुण्याकरीता सीएनजी आवश्यक असून यंदाच्या अंदाजपत्रकात 7 कोटी रुपयांची तरतूद झाल्यास हे अनुदान लवकरात लवकर सर्वांपर्यंत पोहचू शकेल या करिता सहकार्य करण्याचे आवाहन पवार यांनी अनिल शिरोळे यांच्याकडे केले.
सीएनजी पंपावर संपर्क
संतोष सोनटक्के म्हणाले, रिक्षाचालकांसाठीच्या तपासणी शिबिरात चालकांचे आरोग्यविषयक विस्तृत सर्वेक्षण होणार आहे. यामध्ये रिक्षाचालकांना होणार्या व्याधी आणि त्यानुसार आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येईल. सीएनजीच्या वापराचे फायदे आणि पर्यावरणाकरीता त्याची आवश्यकताही सांगण्यात येणार आहे. तपासणीकरीता रिक्षाचालकांनी 9623037315 या क्रमांकावर किंवा सीएनजी पंपावर संपर्क साधावा, असे आवाहनही सोनटक्के यांनी केले.