रिक्षात सापडली 2 लाख रुपयांची बॅग

0

मुंबई । आपल्या रिक्षात विसरलेल्या प्रवाशाची तब्बल दोन लाख रुपयांची बॅग परत करून भांडुपच्या एका रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे. महेंद्र बलराम गायकवाड असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. भांडुप येथील रहिवासी रामप्रसाद साहू कंपनीच्या कामासाठी दोन लाख रुपयांची बॅग घेऊन ठाणे-मनपाडा येथे जात होते. भांडुप येथून ठाण्याला जाण्यास त्यांनी ऑटो रिक्षा पकडली. मुलुंड चेकनाक्याला घाईने उतरताना ते आपल्याजवळील दोन लाखांची बॅग रिक्षातच विसरले. थोड्या वेळाने आपल्या रिक्षात बॅग असल्याचे रिक्षाचालक महेंद्र बलराम गायकवाड यांच्या लक्षात आले.

त्यांनी शाहू यांचा शोध घेतला, पण त्यांना ते भेटले नाही. मग त्यांनी सरळ जवळच असलेले पोलीस स्टेशन गाठले. घडलेला पूर्ण प्रकार त्यांनी उपनिरीक्षक विक्रांत पाटील यांना सांगितले व बॅग त्यांच्या ताब्यात दिली. बॅगमधील कागदपत्रांचा तपास घेऊन पोलीस ठाण्यातूनच बॅगचे मालक रामप्रसाद शाहू यांच्याशी संपर्क करण्यात आला. नंतर ती बॅग त्यांना परत करण्यात आली. रिक्षाचालक गायकवाडांची प्रामाणिकता लक्षात येऊन, मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी फुलांचा गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.