रिक्षावाला बाप आपल्या लेकीसह फर्स्ट क्लासने पास

0

मुंबई । शिक्षणाला वयाची अट नसते असे म्हणत आपली मुलगी बारावीची परीक्षा देत असताना वयाच्या 41 व्या वर्षी मुलुंडचे रिक्षा चालक दहावीची परीक्षा दिली होती. आता या बापलेकींचा परिक्षांचा निकाल लागला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे मुलगी बारावीत पास झाल्यानंतर मंगळवारी वडिलही फर्स्ट क्लास पास झाले आहेत. शरीफ अब्दुल समाद खान असे या रिक्षाचालकाचे नाव असून त्यांच्या मुलीने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. त्यात तिला 66 टक्के मिळाले होते. शिक्षणाचे महत्त्व समजून त्यांनीही विक्रोळीच्या राजपाल विद्यालयातून यंदा 17 नंबरचा अर्ज भरला होता. नुकताच दहावीचा निकाल लागला यामध्ये शरीफ यांना 61 टक्के मिळाले आहेत. त्यामुळे या बापलेकींसाठी आज दुग्ध शर्करा योग आहे.

मुलीनेच परीक्षा देण्यासाठी केले प्रोत्साहीत
दिवसाचे 8-9 तास रिक्षा चालवून आयुष्याचा गुजराणा करणारे शरीफ यांच्या पाच मुलांपैकी एक दुसरीला इंग्रजी माध्यमात शिकत आहे तर रुक्सार ही बारावी पास झाली. रुखारनेच मला दहावीची परीक्षा देण्यास प्रोत्साहीत केल्याचे त्यामुळेच मी परीक्षा देऊ शकलो असे ते अभिमानाने सांगतात. शरीफ आणि त्यांचे कुटुंब उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथून मुंबईत आले. शिकून मोठे होण्याचे स्वप्न पाहणार्‍या शरीफ यांच्यावर सहा भावंडे आणि कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांना वडीलांसोबत पाव विकायला जावे लागत असे. 1991-92 च्या दरम्यान दंगलीच्या वातावरणात त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. घरातील उत्पन्न झपाट्याने कमी झाले होते त्यामुळे काम करणे गरजेचे होते. त्यामुळे आयुष्यात पुन्हा पुस्तकांशी संबध येईल असे त्यांना वाटले नव्हते. पैसे कमविणे आणि घराच्यांचा संभाळ करणे हेच त्यांच्यापुढील आव्हान होते.

8 बाय 12 च्या खोलीत राहतात
शरीफ यांचे कुटुंब मुलुंड येथील बाबु जगजीवनरामम नगर येथील चाळीत 8 बाय 12 च्या घरात राहतात.टिव्ही, फ्रीज असे कोणतेही साहीत्य त्यांच्या घरी नाही. एकदा शिकायचे ठरविल्यावर वय, वेळ या गोष्टी शुल्लक होतात तेव्हा मागे हटायच नाही हे शरीफ यांच्याकडून इतरांनी शिकण्यासारखे असल्याचे शरीफ यांचे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते दिपक सोनावणे यांनी सांगितले.