रिक्षास धडक देवून मद्यधुंद कारचालकाने केली रिक्षाचालकास मारहाण

0

जोरदार धडक देणारी कार शासकीय अधिकार्‍याची; रामानंदनगर पोलिसात तक्रार दाखल

जळगाव: शहरातील आयटीआयजवळ भरधाव कारने मालवाहू रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात रिक्षाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधित कार ही एका शासकीय अधिकार्‍याची असून कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता, अपघातानंतर कारचालकाने मारहाण
केल्याचे जखमी रिक्षाचालक याने बोलतांना सांगितले आहे. दरम्यान धडक एवढी जोरदार होती, यात रिक्षाचे मागचा भाग तुटला तर कारचाहीसमोरील भाग चक्काचूर झाला आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाने रामानंद पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

मालवाहू रिक्षाचे प्रचंड नुकसान
याबाबत जखमीच्या कुटुंबियांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मेहरुण परिसरातील जोशी वाड्यातील कमरोद्दीन शेख बाबू मालवाहू रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करतात. त्यांनी गेल्या दीड-दोन महिन्यांपूर्वी नवीन मालवाहू रिक्षा घेतली होती. गुरूवारी रात्री गोरगरिबांना जेवण वाटप केल्यानंतर ते रिक्षा घेवून शिव कॉलनीकडून महार्गावरुन माघारी निघाले होते. रात्री 11 वाजेच्या सुमारास आयटीआयसमोरून जात असताना समोरुन भरधाव येणार्‍या (एमएच.39.जे.0027) क्रमांकाच्या कारने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचा मागचा भाग तुटून तो दुभाजकात अडकून गेला होता.

उलट रिक्षाचालकावर पैसे चोरल्याचा आरोप
महामार्गावर झालेल्या अपघातात मालवाहतूक रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच कारचे देखील नुकसान झाले आहे. अपघातात रिक्षाचालक कमरोद्दीन शेख यांच्या हाता, पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखातप झालेली आहे. भरधाव वेगाने कार चालविणारा कारचालक हा मद्याच्या नशेत होता. धडक दिल्यानंतर त्याने रिक्षाचालकाला मारहाण करीत माझ्या गाडीतील पैसे व कागदपत्रे चोरल्याचा आरोप तो यावेळी करीत होता. दरम्यान काही वेळानंतर याठिकाणी दुचाकीवर आलेल्या तरूणांसोबत तो चालक फरार झाल्याची माहिती जखमी शेख यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी सुध्दा रात्री घटनास्थळी धाव घेतली होती. नंतर शेख यांनी कार चालकाविरूध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली

मद्यधुंद कारचालक शासकीय अधिकारी
जखमी कमरोद्दीन शेख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेला कारचालक हा एक शासकीय अधिकारी असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत कारचे मालक सी.एस. इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, कार माझ्या पत्नीच्या नावावर आहे. गाडी मित्राला दिली होती, त्याच्याकडून अपघात झाला. मी कारचालवित नव्हतो. तसेच कारचालक दारुच्या नशेत नव्हता. व त्याने रिक्षाचालकासही मारहाण केलेली नाही. कारजवळ कुणीही नसतांना उलट रिक्षाचालकाने कारमधील 40 हजार रुपये चोरुन नेले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असल्याचे इंगळे यांनी दै. जनशक्तिशी बोलतांना सांगितले.