रिक्षा चालकांचे प्रश्‍न सोडवण्याचे आयुक्त शेखर चन्ने यांचे आश्‍वासन : बाबा कांबळे

0

योग्य निर्णय न झाल्यास जानेवारीत तिव्र आंदोलन

परिवहन कार्यालयात बैठक संपन्न

पिंपरी चिंचवड : रिक्षाचालक – मालकांच्या प्रश्‍नांसाठी महाराष्ट्रातील रिक्षा संघटना प्रतिनिधींची बैठक (दि. 30) रोजी (बांद्रा) मुंबई येथिल परिवहन आयुक्त कार्यालयात घेण्यात आली होती. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी रिक्षा संघटना प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे प्रश्‍न समजून घेतले आणि ते प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले आहे. दोन तासापेक्षा अधिक काळ ही बैठक घेण्यात आल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. नविन परवाना बंद करणे, रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन विभागांतर्गत कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणे, इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करणे, पासिंग ट्रॅकचा प्रश्‍न सोडवणे, ओला उबेरसह बेकायदेशीर वाहतूक बंद करणे, बजाज कंपनी आणि त्यांच्या डीलरवर कारवाई करणे यासह अनेक प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली.

बैठकीत यांचा सहभाग…

यावेळी ऑटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, उपाध्यक्ष गफरभाई नदाफ, मारुती कोंडे, प्रमोद घोणे, सहसचिव मच्छिंद्र कांबळे, महेश चौगुले, प्रदेश सदस्य आनंद तांबे, फिरोज मुल्ला, सुरेश गलांडे, भारत नाईक, सुनिल बोर्डे, राजेश बुटले, महादेव विभूते, स्वामी बल्लूर, सुनील पाटील, आनंद चौरे, लखन लोंढे, तुषार मोहिते, आरिफ शेख, इम्रान सय्यद, बालन मुजावर, अशोक इंगळे, जावेद पटवेगर, मोहसीन पठाण, संजय चव्हाण, युनूस तांबोळी, सुखदेव कोळी, उदय कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आरटीओ पासिंगच्या नावाखाली भ्रष्टाचार…

कृती समितीच्या वतीने शेखर चन्ने यांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी शशांक राव म्हणाले, आंदोलनाची दखल घेऊन सरकारने आमच्याशी चर्चा केली या बद्दल आभार. परंतु, बैठकीत ठरल्याप्रमाणे निर्णय न झाल्यास जानेवारीत तिव्र आंदोलन करण्यात येईल. विलास भालेकर म्हणाले नुसत्या चर्चेने आमचे प्रश्‍न सुटणार नाहीत. आश्‍वासनाची पूर्तता झाली पाहिजे, तसेच आनंद तांबे यांनी बजाजच्या डीलर्सनी आर टी ओ पासिंगच्या नावाखाली केलेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची माहिती पुराव्यासाहित सादर केली. गेल्या 15 महिन्यांपासून तक्रार करूनही कारवाई न केल्याचे निदर्शनास आणून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.