भुसावळ : जळगाव उपप्रादेशिक परीवहन विभागातर्फे (आरटीओ) शहरातील स्कूल व्हॅन चालक तसेच रीक्षा चालकांना विविध नियमांचा बडगा दाखवत वारंवार मेमो देवून वाहने बस आगारात जमा केली जात असल्याने सर्वसामान्य रीक्षा चालकांना जगणेदेखील कठीण झाल्याने कारवाईच्या निषेधार्थ व मनमानी थांबवण्याच्या मागणीसाठी पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शहरातील सुमारे 300 वर रीक्षा चालक सहभागी झाले. मोर्चेकर्यानीं आरटीओ अधिकार्यांच्या विरूध्द जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, मोर्चाच्या अनुषंगाने शनिवारी दुपारपर्यंत रीक्षा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावल्याचे चित्र होते.
सोनवणे यांचे साप्ताहिक आंदोलन
10 डिसेबरला सकाळी 10 वाजता भुसावळ ते जळगाव आरटीओ कार्यालयावर रीक्षा चेतावणी मोर्चा नाहाटा कॉलेजपासून निघणार आहे. 13 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जळगाव येथे आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण, 16 डिसेंबरला येथील रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म सहावर काशी एक्स्प्रेस रेल रोको आंदोलन, 19 डिसेंबरला दुपारी दोनला गांधी पुतळ्याजवळ जेलभरो आंदोलन, 21 डिसेंबरला दुपारी दोनला प्रांतांधिकारी कार्यालयासमोर रीक्षा हॉर्न बजाव आंदोलन तसेच 24 डिसेंबरला दुपारी बाराचला प्रांताधिकारी कार्यालयासमोर रीक्षा चालकांचे परीवारासह आंदोलन, अत्याचार बंद करो म्हणत सामूहिक मुंडन केले जाणार आहे.
प्रांताधिकार्यांना निवेदन
भुसावळ पालिकेच्या जुन्या इमारतीसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चाचे नेतृत्व जगन सोनवणे, राकेश बग्गन, पुष्पा सोनवणे यांनी केले. मोर्चा बसस्थानक मार्गे बाजारपेठ पोलिस ठाणे, लोखंडी पूलाखालून शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हंबर्डीकर चौक, शहर पोलिस ठाणे, गांधी पुतळा मार्गे तहसील कार्यालयावरून टेक्निकल हायस्कूलवरून प्रांताधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी आरटीओ अधिकार्यां विरूध्द घोषणाबाजी करीत रीक्षा चालकांनी आंदोलनाचे बॅनर्स हाती धरले होते. भ्रष्ट्राचार करणार्या अधिकार्यांवर कारवाई करा, मेमो देणे बंद करा, नही चलेगी नही चलेगी आरटीओ की दादागिरी नही चलेगी आदी घोषणा मोर्चेकरी रीक्षा चालकांनी दिल्या. प्रांत कार्यालयासमोर आल्यावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पाच सदस्यांना आत सोडण्यात आले. त्यांनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना मागण्यांचे निवेदन दिले.