रिक्षा चालकांना सक्षम बनविण्यासाठी ‘संपर्क अभियान’

0

15 ते 30 जानेवारीपर्यंत मोहीम राबवली जाणार

पिंपरी : मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे, रिक्षा चालकांचे कर्ज माफ झाले पाहिजे. रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन झालेच पाहिजे. ओला-उबेरसह महाराष्ट्रातील बेकायदेशीर वाहतूक बंद झालीच पाहिजेत. रिक्षा चालक मालकांना घरकूल मिळालेच पाहिजे. यासह इतर विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबीत आहेत. या मागण्या सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्यावतीने अध्यक्ष कष्टकर्‍यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ‘संपर्क अभियान’ आणि ‘सह्याची मोहिम’ राबवली जात आहे. दि.15 ते 30 जानेवारी 2020 पर्यंत पुणे शहरात हि मोहीम राबवली जाणार आहे. रिक्षा चालकांचा सर्व्हेचा फार्म भरून नुकतेच या अभियानाची सुरवात करण्यात आली.

रिक्षा चालकांचा सर्व्हे फॉर्म भरले जाणार…
रिक्षा चालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. यासाठी विशेष असा रथ तयार करण्यात आला आहे. संपर्क अभियान रिक्षा चालकांशी संवाद साधुन त्यांचे प्रश्‍न आणि अडचणी समजुन घेतल्या जाणार आहेत. रिक्षा भाडेवाढीबाबत रिक्षा चालकांचे मत जाणून घेतले जाणार आहे. मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना देण्यात येणार्‍या निवेदनावर रिक्षा चालकांच्या सह्या घेऊन सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. रिक्षा चालकांचे सर्व्हेक्षण फॉर्म देखील यावेळी भरले जाणार आहेत. महाराष्ट्र रिक्षा पंचायत वरिष्ठ उपाध्यक्ष रिक्षा चालकांचे जेष्ठनेते आनंद तांबे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, पुणे रिक्षा फेडरेशनचे बाबा शिंदे, बाप्पू भावे, प्रदिप भालेराव, शिवाजीनगर रिक्षा संघटनेचे दत्ता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा संघटनेचे बाप्पू धुमाळ, प्रदीप रवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष नितिन शिंदे, पुणे शहर अध्यक्ष सदाशिव पवार, प्रदेश संघटक लखन लोंढे, प्रफुल शुक्ला, अनिल पाटोळे, सागर धर्मे, गोविंद पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.