पेढे, साखर वाटप करून केला आनंद साजरा
अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी
पिंपरी : रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी विविध योजना सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे रिक्षा चालकांना न्याय मिळणार आहे. यामुळे पिंपरी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रिक्षा चालकांनी एक मेकांना पेढे भरवत, जनतेला साखर, पेढे वाटप करून आनंद साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय मंत्री गिरीश बापट यांचे अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप साळवे, गोकुळ रावळकर, इकबाल शेख, बंटी साळवे, साहेबराव काजळे, यांच्या सह रिक्षा चालक, मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आश्वासन पूर्ण केले
या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकरी मंडळ स्थापणेची घोषणा केली आहे. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे यासाठी आम्ही नुकताच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे शशांकराव, विलास भालेकर यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढला होता. यात परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आमदार गौतम चाबुकस्वार यांनी स्वतः महामोर्चात सहभागी होऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. तसेच दिनांक 23 जानेवारी 2018 रोजी संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात रिक्षा संघटनेची बैठक घेऊन कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी आपला शब्द खरा करून दाखविला.
निर्णयाची तातडीने अंमलबजावणी
रिक्षा चालकांनी संघटित होऊन लढा दिल्यामुळेच आज कल्याणकारी मंडळ होत आहे. कामगार नेते स्व. शरदराव यांचे स्वप्न पूर्ण होत आहे, याबद्दल आम्ही समाधानी आहोत. परंतु या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी आणि परिवहन खात्याच्या अंतर्गत हे मंडळ स्थापन व्हावे या साठी पाठपुरावा करणार आहोत. याबाबत लवकरच मुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्या सोबत बैठक घेणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट सांगितले आहे. पुढील काळात निधी वाढविणार असेही ते म्हणाले. यामुळे मी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे महाराष्ट्रातील 15 लाख रिक्षा चालकांच्यावतीने अभिनंदन करतो, असेही यावेळी बाबा कांबळे म्हणाले.