पिंपरीत शुक्रवारी मध्यरात्री घडली घटना
पिंपरी-चिंचवड : प्रवाशी म्हणून बसलेल्या एकाला रिक्षा चालकासह रिक्षात बसलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या पिंपरीत घडली. या घटनेत प्रवाशाकडील रोख रकमेसह एक लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. रुपेश तळेकर (वय 33, रा. रहाटणी) असे लुटण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी तळेकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिकंदराबादहून आले तळेकर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश तळेकर हे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेने सिकंदराबाद येथून पिंपरी रेल्वे स्टेशनवर आले. त्यांनी शगुन चौकातील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून 30 हजार रुपये काढले. त्यांच्याकडे अगोदरचे 40 हजार रुपये होते. एकूण 70 हजार रुपये त्यांनी बॅगमध्ये ठेवले होते. रहाटणी फाटा येथे जाण्यासाठी ते कराची चौकात रिक्षाची वाट बघत थांबले होते. त्याचवेळी एक रिक्षा तेथे आली. त्या रिक्षात ते बसले. त्या रिक्षामध्ये अगोदरच एक पुरूष, एक महिला व तिच्या हातात लहान बाळ होते.
चाकूचा दाखवला धाक
रिक्षा चालकाने अचानक रिक्षा जिजामाता रुग्णालयाच्या पाठीमागच्या गल्लीत घेतली. त्यावर तळेकर यांनी रिक्षा आतमध्ये का घेतली, असे विचारणा केली. त्यावेळी रिक्षा चालकाने महिलेला घरी सोडून पुढे जाऊ, असे सांगितले. रिक्षा पुढे गेल्यानंतर रिक्षा चालकाने रिक्षा थांबवून तळेकर यांच्या पोटाला चाकू लावला. शेजारी बसलेल्या दुसर्या इसमानेदेखील त्यांच्या मानेवर चाकू ठेऊन त्यांच्याकडील रोख 70 हजार रुपये, दोन मोबाईल इतर साहित्य असा 90 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. या घटनेनंतर त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक राजू ठुबल तपास करत आहेत.