रिक्षा चालक होणार महापौर;नियोजित महापौर राहुल जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास

0
चिखली ते पिंपरी या मार्गावर चालवत होते सहा वर्षे सिक्स सिटर 
पिंपरी-चिंचवड : महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून जाधववाडीचे नगरसेवक राहुल जाधव यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांची महापौरपदी निवड निश्‍चित असून शनिवारी निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. रिक्षा चालक ते शहराचे प्रथम नागरिक असा प्रेरणादायी प्रवास जाधव यांचा आहे.
राहुल जाधव मूळचे जाधववाडी-चिखलीचे रहिवाशी आहेत. 15 मार्च 1982 मध्ये त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. जाधववाडीतील जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेत त्यांचे चौथी पर्यंत शिक्षण झाले. सातवीपर्यंतचे शिक्षण चर्‍होलीगावातील वाघेश्‍वर विद्यालयात झाले आहे. नववीचे शिक्षण पुंरदर तालुक्यातील मावशीच्या गावी पिंपळे येथे झाले. घरची हलाखीची परस्थिती असल्यामुळे दहावी झाल्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. शेती परवडत नसल्यामुळे त्यांनी जोडधंदा म्हणून सिक्स सिटर चालविण्यास सुरुवात केली. चिखली ते पिंपरी या मार्गावर त्यांनी सिक्स सिटर चालविला. पाच ते सहा वर्ष ते रिक्षा चालवत होते. त्यानंतर काही काळ त्यांना एका कंपनीत चालक म्हणून नोकरी केली.
मनसेचेही होते नगरसेवक
राज ठाकरे यांना गुरु म्हणून 2006 मध्ये जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करण्यास सुरुवात केली. मनसेच्या माध्यमातून आंदोलनात सहभाग घेतला होता. 2012 साली जाधव यांनी मनसेकडून पिंपरी महापालिकेची पहिली निवडणूक लढविली आणि ते पहिल्यांदाच मोठ्या मताधिक्याने नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2017 मध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला. फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक दोन चिखली गावठाणातून भाजपच्या चिन्हावर महापालिका निवडणूक लढविली. या निवडणुकीत तीन हजार मतांच्या फरकाने ते निवडून आले आहेत.
जाधव यांचा आवडता छंद बैलगाडा शर्यत असून बैलगाडा क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. जाधव यांच्या गळ्यात आता पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदाची माळ पडणार आहे. रिक्षा चालक ते शहराचे प्रथम नागरिक असा त्यांचा आजवरचा प्रवास आहे.
शहर विकासाठी वैभवशाली काम करणार
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांला महापौरपदी काम करण्याची संधी दिली आहे. त्यांचा विश्‍वास सार्थ ठरविणार असून पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात वैभवशाली काम करणार आहे. माझे राजकीय दैवत महेश लांडगे यांनी माझ्यावर विश्‍वास टाकला आहे. त्यांचा विश्‍वास सार्थ ठरविण्याचे काम मी येणार्‍या काळात करेन.
राहुल जाधव
भाजपमध्ये कोणतेही गट-तट नाहीत. खर्‍या ‘ओबीसी’ला न्याय दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.
आमदार महेश लांडगे 
महापौर, उपमहापौरपदासाठी सर्वानुमते अर्ज भरण्यात आला आहे. राहुल जाधव दुस-यांदा निवडून आले आहेत. पालिका कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे. उपममहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले सचिन चिंचवडे देखील चांगले कार्यकर्ते आहेत. भाऊसाहेब भोईर सारख्या बलाढ्य नेत्याला पराभूत करुन ते निवडून आले आहेत. दोन्ही उमेदवार तरुण आणि सुशिक्षित असून त्याचा शहराला फायदा होईल.
सभागृह नेते एकनाथ पवार