रिक्षा – टॅक्सीचालक मालक होणार आक्रमक

0

नवी मुंबई । महाराष्ट्र राज्य सरकारने मागेल त्याला रिक्षा व टॅक्सी परवाने खुले केल्यामुळे राज्यात या पुढे मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्‍न उपस्थित होणार आहे. परवाना खुले केल्यामुळे नवी मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना एकत्र येऊन राज्य सरकारच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी रिक्षा व टॅक्सी चालकाच्या बैठका घेऊन जनजागृती सभा घेत असल्याची माहिती एस. के. गृप ऑफ ऑटो टॅक्सी संघटना नवीमुंबईचे सरचिटणीस बाळकृष्ण खोपडे यांनी दिली.

लवकरच परिवहन मंत्र्यांची भेट
रिक्षा स्टँड वाढवण्यात यावेत. प्रामाणिक रिक्षाचालक वर परिवहन विभागाने कारवाई थांबवावी, या प्रश्‍नाबाबत लवकरच नवीमुंबईतील एक शिष्टमंडळ परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेणार असल्याचे रिक्षा युनियनचे सरचिटणीस खोपडे यांनी सांगितले.वाशी येथे या सभेला रिक्षा युनियनचे पदाधिकारी लक्ष्मण मेंदगे,प्रल्हाद शेलारकर,सुभाष पवार,रमेश धुमाळ व मोठ्या प्रमाणात रिक्षा व टॅक्सी चालक उपस्थित होते.

अधिकृत 13 हजार, तर 7 हजार बोगस
नवी मुबई शहरात एकूण सुमारे 13 हजार अधिकृत रिक्षा तर बोगस अंदाजे 7 हजार रिक्षा चालत आहेत. बोगस रिक्षांवर परिवहन विभाग नावापुरती कारवाई करत असतो. तसेच ओला ऊबेरमुळे आधीच रिक्षा व टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. असे असताना राज्य सरकारने मागेल त्याला परवाना ही संकल्पना आणुन रिक्षा व टॅक्सी चालकांना या पुढे घर चालवणे देखील कठीण होणार आहे. या संकल्पनेमुळे या शहरात मोठया प्रमाणात बेरोजगारीचा व स्व:यंरोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार आहे.तसेच नवीमुंबई शहरात खाजगी, ओला,ऊबेर व परिवहन नवीमुंबई,ऑटो व टॅक्सी आहेत.या पुढे नव्याने येणार्‍या रिक्षा व टॅक्सीमुळे मोठया प्रमाणात वाहतूक व पार्किंगचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

निर्णय कोणाच्या भल्यासाठी?
परिवहनच्या कायद्याने शहरातील लोकसंख्येनुसारच परवाना दिला पाहिजे असे असताना राज्य सरकार कोणाच्या भल्यासाठी हे विघातक निर्णय घेत आहे; असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तर नवीमुंबई शहरात लोकसंख्येनुसार रिक्षा व टॅक्सी परवाने द्यावेत. बोगस रिक्षाधारकांवर कारवाई करण्यात यावी.