हडपसर । वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून गाडीतळ, गांधीचौकापासून महादेवनगर रस्त्यावर बेफामपणे आणि बेदरकारपणे रिक्षा चालविणार्या रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवाशी आणि पादचार्यांच्या जीवाशी खेळणारे हे चालक मुख्यत्वे करून गाडीतळ ते महादेवनगर व ससाणेनगर, महम्मदवाडी या परिसरातील आहेत. तीन आसनी रिक्षांमधून सहा प्रवाशांची बेकायदेशीरपणे वाहतूक सुरू आहे.
नियमापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारे रिक्षाचालक महादेवनगर आणि गाडीतळ या मार्गावर सर्रास दिसतात. गाडीतळ पीएमपी बिल्डिंगच्या प्रवेशद्वारावर तसेच दत्त मंदिराजवळील पादचारी मार्गावर रिक्षा उभा करून अनेकदा या मार्गावर जाणार्या पीएमपी बसच्या समोरच रिक्षा उभी करून प्रवासी घेण्याचे काम हे चालक करत असतात. महादेवनगर व मांजरी भागातील रिक्षा चालकांकडून हे प्रकार अधिक प्रमाणात केले जात असल्याचे दिसते. तसेच प्रकार गांधी चौकात व महम्मदवाडी, ससाणेनगर सय्यदनगरकडे जाणारे रिक्षा चालक करीत असतात.
पादचारी मार्गावरही अतिक्रमण
गाडीतळ पीएमपी बिल्डिंगसमोर दत्त मंदिराजवळ रस्ता अरूंद आहे. याशिवाय येथे बस प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावर उभ्या राहतात. त्यातच पादचार पादचारी मार्गावर 70 ते 90 रिक्षा थांबून प्रवासी घेतले जातात. यामुळे पादचारी जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडत असतात. यात सर्वाधिक हाल होतात वृद्ध, लहान मुले आणि स्त्रियांचे. या रिक्षाचालकांना कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते भीक घालत नाहीत. रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा गाडीतळ पीएमपी स्थानकापासूनच सुरू होतो. गाडीतळ पीएमपी कॉर्नर, बस आत-बाहेर पडण्याचे गेट, दत्त मंदिर तसेच महादेवनगर येथे अलाहाबाद बँक गर्दी करून उभ्या असलेल्या रिक्षा या महादेवनगर, पंधरानंबर व सिरम कंपनी समोरील वाहतुकीला अडथळा करतात. प्रवाशींची ने-आण करताना अनेक रिक्षाचालक आपापसात स्पर्धा लावतात. गाडीतळ ते पुणे रेल्वेगेट दरम्यान वेगाची ही जीवघेणी स्पर्धा सुरू असते. पीएमपी डेपोतून बस जात असताना, पंधरा नंबर चौकात थांबण्याचा सिग्नल असूनही मांजरी रेल्वेगेटवर गेट लागण्यापूर्वी व उघडल्यानंतर हे रिक्षाचालक बेधडक रिक्षा घुसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.
पुलाखाली उभ्या असतात रिक्षा
जास्त प्रवाशी घेतल्यास किंवा बेफामपणे रिक्षा चालविणार्या रिक्षाचालकांना हटकले की ते उद्धटासारखे वागतात. ससाणेनगरला जाणार्या रिक्षा गांधी चौकात उड्डाणपुलाखाली भर रस्त्यात प्रवासी घेण्यासाठी उभ्या केल्या जातात. तेथेच पोलीस वाहतूक नियोजनासाठी थांबलेले असतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते.