रिक्षा परवानाधारक महिलांना प्रमाणपत्र घरपोच

0

पुणे । पुणे परिवहन कार्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनाची अनोखी भेट मिळणार आहे. रिक्षा परवानाधारक महिलांना वाहन तपासणीसाठी धावपट्टीवर यावे न लागता योग्यता प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल, असे नियोजन आम्ही करू, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी स्पष्ट केले आहे. ऑटोरिक्षासाठी वार्षिक योग्यता प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते मिळण्यासाठी आरटीओच्या धावपट्टीवर जाऊन रिक्षाची तपासणी करावी लागते. त्यासाठी परवानाधारक उपस्थिती राहणे आवश्यक आहे. बहुतेक महिला परवानाधारकांचे परवाने मूळ पुरुष परवानाधारकाचे निधन झाल्यावर वारस म्हणून हस्तांतरित झाले आहेत. या महिला स्वतः रिक्षा चालवत नाहीत. मात्र, प्रशासनाच्या अटीमुळे त्यांनाही रिक्षा चालकाबरोबर उपस्थित रहावे लागते.

कामकाज ऑफलाइन पद्धतीनेही
वार्षिक वाहन तपासणीच्या पद्धतीमध्ये परिवहन विभागाने बदल केले आहेत, त्यामुळे हजारो रिक्षा वार्षिक तपासणीविना आहेत. या परिस्थितीवर उपाय काढावा, वाहन तपासणीची पूर्व नियोजित वेळ घेण्यासाठी वेबसाइट खुली होण्याची मध्यरात्रीची वेळ सकाळची करावी. ऑफलाइन पद्धतीनेही कामकाज व्हावे. मान्य केल्यानुसार रिक्षांना वेगळा कोटा द्यावा, अशा मागण्या रिक्षा पंचायतीने यावेळी निवेदनाद्वारे केल्या.

रिक्षा पंचायतीचा इशारा
नवीन रिक्षा तात्पुरत्या नोंदणीशिवाय वितरित करत आहेत. याकडे आजरी यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर संबंधित वितरकांचे परवाने निलंबित करण्याच्या सूचना आजरी यांनी दिल्या. एक आठवड्यात या परिस्थितीत फरक न पडल्यास संघर्ष करण्याचा इशारा पंचायतीने दिला. शिष्टमंडळात सिद्धार्थ चव्हाण, रावसाहेब कदम, आनंद बेलमकर यांचा समावेश होता.