नवी मुंबई । खारघर रेल्वेस्थानकाबाहेर असलेल्या रिक्षा स्टँडवरून खारघर आणि तळोजा रिक्षा युनियनमध्ये झालेला वाद अद्याप मिटलेला नाही. तेच एका रिक्षा संघटनेकडून रिक्षा बंदचे आंदोलन छेडण्यात आले आहे. परिणामी, लाखभराची लोकवस्ती असलेल्या खारघरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून ज्या रिक्षा आंदोलनात सहभागी आहेत, अशा रिक्षांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया आज पनवेल आरटीओकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे काही रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत. खारघरमधील एकता युनियन आणि तळोजा रिक्षा युनियनच्या आंदोलनामुळे खारघरवासीयांना गेल्या 17 दिवसांपासून नाहक त्रास सहन करावा लागला आहे. आंदोलनाचा आजचा 18 वा दिवस आहे. हद्द निश्चित होत नाही तोपर्यंत खारघर एकता रिक्षा युनियनने आपल्या 900 रिक्षा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने खाराघरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन
रेल्वेस्थानकासमोर आरटीओने खारघर एकता रिक्षा युनियनला स्टँड मंजूर केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या स्टँडचे भाडे युनियन सिडकोला भरत आहे. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त म्हणून आमचा अधिकार या रिक्षा स्टँडवर असल्याचा दावा खारघर एकता युनियनने केला आहे. तळोजा रिक्षा युनियनने आमच्या स्टँडवर येऊन भाडे न आकारता त्यांना समोर जागा देण्यात आली आहे. आमची ही मागणी मान्य न झाल्यास कुटुंबासहित आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा खारघर रिक्षा युनियनने दिला आहे. खारघर रेल्वेस्थानकाबाहेरील स्टँड एकता युनियनला मिळाले असल्याने त्यांच्या सदस्यांना पहिले प्राधान्य देण्यात यावे. मात्र, हे करताना हद्दीवरून कोणाला आडवता येणार नसल्याने वाद घालणार्या रिक्षाचालकांचे परमिट रद्द करण्याची कारवाई पनवेल आरटीओने सुरू केली.