रिचार्जला 2 टक्के कमिशन देण्याचे आमिषाने दोन जणांना 17 लाखांत गंडविले
जळगाव – रिचार्जसाठी अॅप बनावून त्याव्दारे इतरापेक्षा 2 टक्के कमिशन देण्याचे आमिष देत इंदोरच्या पती-पत्नी दाम्पत्याने शहरातील दोन रिजार्च विक्रेत्या दुकानदारांना 17 लाख 45 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. दरम्यान संबंधित संशयित दाम्पत्याने नाव व पत्ता बनावट सांगून फसवणूक केल्याचे समोर आले असून इंदोरचे दाम्पत्य जिल्ह्यात अनेकांना कोट्यवधीत गंडवून शहरातून पसार झाले आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरातील फातेमा नगरातील अमान ईरफान यांचा मोबाईल रिचार्जसाठी 2 टक्के कमिशन देण्याचे आमिष दिले. यानंतर त्यांचा विश्वास जिंकत त्याला रिचार्जसाठी बॅलन्सही उपलब्ध करुन दिला. रिचार्जपोटी संबंधित संशयितांनी अमान यांच्याकडून 14 लाख 5 हजार रुपये घेतले. यानंतर त्यांचा संपर्क न झाल्याने व फसवणुकीची खात्री झाल्यावर अमान यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तर दुसर्या घटनेत शहरातील मुक्ताईनगर येथील भाविक रमेशचंद्र वेद यांना दाम्पत्याने 3 लाख 40 हजार 324 रुपयात फसवणूक केली. अशा प्रकारे दाम्पत्याने दोघांनी एकूण 17 लाख 45 हजार 324 रुपयात फसवणूक केली असून याप्रकरणी 10 जानेवारी रोजी सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयिताचे दोन नावांचे पॅनकार्ड
तक्रारदारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मोहम्मद समीर शेख जहीर उर्फ राजाभाई उर्फ करीमोद्दीन असे संशयिताचे नाव असून या नावाचे एक पॅनकार्ड व आधारकार्ड तर दुसर्यावर पॅनकार्डवर मोहम्मद करीमोद्दीन खान असे नाव आहे, तसेच त्याच्या पत्नीचे ईर्शाद बी समीर शेखअसे नाव आहे. समीर नावाच्या पॅनकार्डवर जळगाव शहरातील प्लॉट नं 1 व 2 आर्यनपार्क अपार्टमेंट, रामनगर चौक असा पत्ता असून दुसर्या पॅनकार्डवर इंदोरचा पत्ता आहे.
अशी केली फसवणूक
संशयित खान दाम्पत्याने बीगकिंग या नावाचे अॅप तयार केले. त्यावरुन रिचार्जपोटी दुकानदाराला ग्राहकाकडून 2 टक्के कमिशन मिळेल असे आमिष दाखविले. त्याव्दारे फसवणूक केली. 2011 पासून दोघांचे जळगावात वास्तव्य असून सात वर्षात विश्वास संपादन करुन अनेकांना गंडविल्याची शक्यता आहे. त्यामुळे तक्रारदाराची संख्या वाढून फसवुकीचा आकडा 1 कोटीच्या घरात जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फसवणुकीनंतर संबंधित दाम्पत्य शहरातून पसार झाले असून त्यांनी तयार केलेले अॅप व त्यांचे संपर्क क्रमांकही बंद आहे.
कोट
रिचार्जच्या नावाखाली फसवणुकीबाबत दोन जणांची तक्रार आली आहे. यात अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. ज्यांची कुणाची अशाप्रकारे तक्रार झाली असेल त्यांनी प्रत्यक्ष माझ्याकडे अथवा सायबर पोलिसात तक्रार द्यावी. संशयितांची माहिती मिळविण्यात येत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल – अरुण निकम, पोलीस निरिक्षक, सायबर पोलीस ठाणे