रिझर्व्ह बँक आणणार 200 रुपयांची नवी नोट?

0

नवी दिल्ली – भाजप सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर देशात चलनातील नोटांबाबत अनेकदा खळबळजनक घटना घडत गेल्या. 1000, 500 रुपयांच्या नोटा निकाला काढल्या. यानंतर 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या. या नोटांचा लोकांना सराव होत असतानाच आता रिझर्व्ह बँक 200 रुपयांची नवी नोट आणण्याच्या तयारी असल्याचे समजते आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यावर्षी जूननंतर 200 रुपयांच्या नोटा आणण्याची शक्यता आहे, असे वृत्त आहे. गेल्या महिन्यात झालेल्या एका बैठकीत रिझर्व्ह बँकने 200 रूपयांची नोट बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सांगितली जात आहे. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाइव्ह मिंटने आपल्या अहवालात या नव्या नोटांच्या येण्याचा दावा केला आहे. आरबीआयला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर जूननंतर 200 रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर, जर रिझर्व्ह बँकेकडून 200 रुपयांची नोट बाजारात आली तर 2 हजार रुपयांच्या नोटांनंतर बाजारात येणारे हे दुसरे नवे चलन असणार आहे. गेल्या काही दिवसांत रिझर्व्ह बँकेकडून नव्या ढंगात एक हजारांची नवी नोट येणार असल्याची चर्चा होती. मात्र, रिझर्व्ह बँकने हे वृत्त फेटाळून लावत अशा चर्चेला पूर्णविराम दिला आहे.