भुसावळ । येथील पीसी-1, 2 व 3 क्षेत्रातील जळगाव रोड, यावल रोड, वरणगाव रोड, जामनेर रोड तसेच भुसावळ तालुक्यात अनेक ठिकाणी 80 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांना 30 दिवसांपेक्षा जास्तीचे बील देण्यात आले आहे. या सर्व भागात विज मीटर रीडिंग 45 दिवसानंतर घेण्यात आलेले होते. रीडिंग उशिराने घेतले गेल्याने मे-जून 2017 चे साधारणपेक्षा 40 टक्के जास्त बिल आले.
तीन वर्षांपासून घडतो प्रकार
मागील तीन वर्षापासून हा प्रकार सतत घडतो. विशेष म्हणजे एप्रिल-मे-जून महिन्यात तर तक्रारी वाढतात. मीटर रीडिंग उशिरा घेतले की 10 एप्रिल रोजीच्या कंपनीच्या कमर्शियल सर्कुलर नंबर 284 नुसार प्रो राटा पध्दतीने ग्राहकांना नियमानुसार स्लॅब बेनिफिट द्यावे लागते.
शेतकर्यांना सहन करावा लागतो आर्थिक भूर्दंड
उत्पादन शुल्क वाढले तरी स्लॅब बेनिफिट दिल्याने महावितरणचे नुकसान होते. तसेच 22 दिवसांपेक्षा कमी दिवसांचे रीडिंग घेतल्यास महावितरण ग्राहकांना कोणतेही स्लॅब बेनिफिट देवू शकत नाही त्यात ग्राहकांचे नुकसान होत आहे. तसेच शेती पंपावर असलेल्या विज मीटरचे रीडिंग घेतले जात नसून शेतकरी बांधवाला ऐवरेज रीडिंग देण्यात आले. मे महिन्यात काम नसते तसेच पावसाळ्यात शेतीला पाण्याची कमी गरज असते. मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड शेतकर्याला बसत आहे.
ग्राहकांची फसवणूक
वारंवार तक्रार करूनसुद्धा मीटर रीडिंग एजेंसीवर कारवाई का करीत नाही. विज वितरण अधिकारी एजंसीला पाठीशी का घालतात. नागरिकांना मनस्ताप झालेला होता. तसेच मीटरच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यात 1 सप्टेंबर 2010 पासून मीटर खराब झालेले आहे असे असतांना सुद्धा एवरेज रीडिंग देवून ग्राहकांची फसवणूक केली आहे.
यांनी दिले निवेदन
या सर्व विषयांवर कारवाई करावी अशी मागणी भुसावळ शिवसेना युवासेनाच्या वतीने तालुका प्रमुख समाधान महाजन, प्रा. धिरज पाटील, उपतालुका प्रमुख नितिन सोनवणे, युवासेना पदाधिकारी सूरज पाटील परिसरातील नागरिक नारायण निकम, हरदित सिंह, डॉ. दिपक जावळे, सुहास मुजुमदार, गजानन पाटील, विशाल लोखंडे, लक्ष्मन ठाकुर, मधुकर घाटे यांनी तापी नगर येथील विज वितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. याबाबत ऐजंसिवर कारवाई केल्याचे लेखी आदेश मागितले आहे. परंतु ऐजन्सीला पाठीशी घालण्याचा प्रकार वितरणच्या अधिकारी वर्ग करत असून त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचे जाणवत आहे. त्यांच्या कडून कारवाई होण्याची अपेक्षा नसून आता आपणच थेट कारवाई करावी अन्यथा शिवसेना तसेच युवासेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.