जळगाव। तालुक्यातील रिधूर येथील दीपक आनंदा पाटील (वय 26 ) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पिंप्राळा रेल्वेगेटजवळील यश लॉनसमोरील रेल्वे रूळाच्या बाजूला शनिवारी सकाळी 11 वाजता हा मृतदेह आढळून आला. दरम्यान, दीपकचा उजवा पाय, डावा हात वाकलेला असून डाव्या बाजूला कमरेच्यावर काही धारदार शस्त्राचे छिद्र आढळून आल्याने त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
कंत्राटी कामगार
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मुळचा रिधुर येथील राहणारा दीपक हा श्रीकृष्ण कॉलनीत राहणारे त्याचे काका शरद महारु पाटील यांच्याकडे राहत होता. गेल्या वर्षभरापासून तो जैन व्हॅली या कंपनीत कंत्राटी पध्दतीने कामाला होता. त्यातच शुक्रवारी दुपारी चार वाजता कंपनीतून घरी आला. काही वेळ घरात थांबल्यानंतर बाहेरुन फिरुन येतो असे सांगून सायंकाळी सहा वाजता तो मोटारसायकल घेऊन घराबाहेर पडला. 10 वाजून देखील दिपक घरी न आल्याने काका व कुटूंबियानी त्याच्या मोबाईलवर फोन लावला मात्र, फोन देखील लागत नव्हता. त्यानंतर शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्याचा रेल्वे पटरीच्या बाजूला मृतदेहच आढळून आला.
आधार व मतदानकार्ड वरुन पटली ओळख
पिंप्राळा रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना दिपकच मृतदेह रेल्वे रूळाजवळ दिसून आल्याने त्यांनी लागलीच रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन खिशातील वस्तू तपासल्या असता. त्यात पाकीट आढळून आले. त्यात आधारकार्ड, मतदान कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, 355 रुपये रोख, कुटुंबातील सदस्यांचे फोटो व काही कागदपत्र आढळून आली. मृतदेहाच्या शेजारी त्याचा मोबाईल होता. आधारकार्डवरुन पोलिसांनी दीपकची ओळख पटविली.
मोटारसायकल मिळाली
दिपक हा शुक्रवारी सायंकाळी ज्या मोटारसायकलने बाहेरून फिरून येतो सांगून निघून गेला होता. ती मोटारसायकल यश लॉन जवळील एका अपार्टमेंन्टजवळ पोलिसांना मिळून आली. मात्र, त्या मोटारसायकल चावी पोलिसांना मिळून आली नाही. जिल्हा पेठ पोलिसांनी मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. दिपक याच्या अंगावरील जखमांमुळे त्याचा घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दिपक याच्या पश्चात आई-वडील तसेच दोन बहिणी असा परिवार आहे. आई-वडील रिधूर येथे राहत असून वडील शेती व्यावसाय करतात. दरम्यान, दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयात दिपकच्या नातवाईकांसह मित्रमंडळींनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर कुटूंबियांनी मनहेलवणारा आक्रोश केला होता. तसेच पोलिसांनीया प्रकरणाच्या तपासाला सुरूवात केली आहे. दिपक घराबाहेर निघाल्यानंतर कुणाला भेटला तसेच कुणाची बोलला याची चौकशी होणार आहे.