मुंबई । रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीतर्फे येत्या सोमवार, 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राजमाता जिजाऊ आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव आणि महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत योगदान दिलेल्या ज्येष्ठ महिलांचा संघर्षमाता दिवंगत हौसाआई आठवले पुरस्कार 2018 प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे.
स्त्रीशक्तीचा सन्मान करणार्या या महिला मेळाव्यास राज्यभरातील महिलांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक आणि सामाजिक नेत्या सीमाताई आठवले यांनी केले आहे. संघर्षमाता दिवंगत हौसा आई आठवले पुरस्कार 2018 चा सन्मान यंदा अरुणाबाई बोडके, कमलताई परदेशी, मनीषाताई तोकले, आशाताई गिरी, बनुताई येलवे, सिंधुताई पगारे, माजी नगरसेविका फुलाबाई सोनवणे, अभिनेत्री प्रेमा किरण, शोभा मोतीराम, कुसुमताई गांगुर्डे या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. या महिला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच सीमाताई आठवले या प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या महिला मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून महिला बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार नीलमताई गोर्हे, भाजप प्रवक्त्या शायना एन सी, आशाताई लांडगे, श्रद्धा भातंब्रेकर, माई देशमुख, चांद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख वक्ते म्हणून रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, शिलाताई गांगुर्डे माजी आमदार सुमंतराव गायकवाड तसेच स्वागताध्यक्ष गीताताई कपूर आणि उषाताई रामलू असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. अभयाताई सोनवणे या आहेत. कार्यक्रमापूर्वी जागर समतेचा वाद्यवृंद सादर होईल.