रत्नागिरी – राजापुर तालुक्यातील नाणार परिसरात सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येत असलेल्या पेट्रोलियम रिफायनरी प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्तांना ङ्गवेट ऍन्ड वॉचफची भुमिका घेतली आहे. या प्रकल्पाबाबत शासकीय अधिसूचनेनंतरच विरोध करावा असा निर्णय संभाव्य प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सनदशीर पध्दतीने हा विरोध करावा असेही या बैठकीत ठरवण्यात आले.
नाणार, कात्रादेवीसह सुमारे 14 गावांमधील 1400 एकर जमीन संपादित करुन त्यावर 2 लाख कोटी रुपयांचा पेट्रोलियम रिफायनरीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची योजना केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या प्रकल्पाला पूर्ण पाठींबा आहे. रोजगार वाढीसाठी प्रकल्प झालाच पाहिजे, असे भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी म्हटले आहे. तर राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी, काँग्रेसच्या आमदार हुस्नबानू खलिफे यांनी या प्रकल्पाला विरोध करण्याचे जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर नाणार हायस्कूल येथे नुकतीच परिसरातील नागरिकांची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत सविनय विरोध करण्याचे ठरले. पोलिसांकडून दाखल करण्यात येणाऱया विविध केसेसना तोंड देताना नेहमीच आंदोलक जेरीस येतात. हे पाहता केस दाखल होण्याशिवायचे अन्य मार्ग वापरुन सरकारला प्रकल्प रद्द करायला भाग पाडू असा विचार बैठकीत झाला. तथापि या संदर्भातील अधिसूचना जारी झाली नसल्याने चर्चा केवळ अधांतरी आहेत. अधिसूचना जाहीर झाल्यावर आंदोलनाची पावले टाकू असा निर्णय बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले.