नाणारसह 16 गावांतील ग्रामस्थांना मोठा धक्का!
मुंबई : कोकणात नाणारसह 16 गावांमध्ये उभारल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पासंबंधी गुरुवारी रात्री वर्षावर अतिशय महत्त्वाची बैठक झाली. मात्र या बैठकीतून प्रकल्प विरोधी समितीच्या अध्यक्षांनाच वगळल्यामुळे ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. रिफायनरीमुळे राजापुरमधील 14, तर देवगडमधील 2 गावे विस्थापित होणार तर आहेतच, पण कोकण परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीवर त्याचा मोठा घातक परिणाम होणार आहे. विकासाच्या नावाखाली हा प्रकल्प उभारला जात असल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र ही जमीन जागा आम्हाला अनेक दशके भरभरून देत असताना विकासाच्या नावाखाली विनाश ओढवून घेणार नाही, यासाठी प्रसंगी प्राण गेले तरी चालतील, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी उद्धव फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप संजू शकलेले नाही.
कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक महिने 16 गावांमधील ग्रामस्थ लोकशाही मार्गाने लढा देत आहे. आता या लढ्यात राजापूर परिसरातील 70 हजार गावकरी एकवटले आहेत. या प्रकल्पाविषयी 28 नोव्हेंबरला मातोश्रीवर ग्रामस्थांची बैठक झाली होतो. खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत आक्रमक पवित्रा घेणाऱ्या वालम यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. मात्र ग्रामस्थांनी वालम असल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत ही बैठक होणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे शेवटी उद्धव यांनी वालम यांना चर्चेला बोलावले होते.
राणेंच्या उडीने सेनेची धावपळ
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ग्रामस्थांच्या बाजूने आंदोलनात उडी घेतल्यामुळे सेनेची धावपळ उडाली आहे. हा प्रकल्प रद्द करण्यासाठी मी तुमची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट घेऊन देतो, असे राणे यांनी ग्रामस्थांना सांगितल्यामुळे सेनेचे नेते कावरे बावरे झाले. खासदार विनायक राऊत यांनी ही बाब उद्धव यांच्या कानी घातली. आपण पुढाकार घेतला नाही तर राणे भाव खाऊन जातील आणि याचा मोठा फटका आगामी निवडणुकांमध्ये सेनेला बसू शकतो, असे सांगितल्यामुळे शेवटी तातडीने फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यास उद्धव तयार झाले.
गावच्या संघटनेची मीटिंग माननीय मुख्यमंत्री व माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर रिफायनरी प्रकल्पसंदर्भात चर्चा करण्यासाठी वर्षा बंगल्यावर संध्याकाळी ६ वाजता लावण्यात आली. तरी आपल्या संघटनेचे अध्यक्ष अशोकदादा वालम यांना या मीटिंग पासून दूर ठेवण्यात आले. म्हणजेच डावलण्यात आले. त्यामुळे आपण कोणीही या मीटिंग मध्ये सहभागी व्हायचे नाही असा संघटनेचा निर्णय आहे.
सरचिटणीस
को.री.प्र.वि.स.संघटना