मुंबई । राजापूरच्या तेल शुद्धीकरण कारखान्याला (रिफायनरी) कोकणातील जनतेने प्रखर विरोध केला आहे. प्रकल्पग्रस्त गावांसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आणि मुंबईतील कोकणवासीयांनी आंदोलन उभे केले आहे. शुक्रवारी (8 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानात येथे रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले आहे. पृथ्वीच्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर, मानवजात व जीवसृष्टी वाचवण्याच्या दृष्टीने, पॅरिस कराराचे पालन करण्यासाठी या लढ्यास अत्यंत महत्त्व आहे. या प्रकल्पग्रस्त गावांसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मुंबईतील कोकणवासीयांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. म्हणून या आंदोलनास महाराष्ट्रातील व देशातील मान्यवरांनी व संस्था, संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला. यात पी. बी. सावंत, र. ग. कर्णिक, बंडातात्या कराडकर, बी. जी. कोळसे-पाटील, प्रवीणाबेन देसाई, प्रा. एच. एम. देसरडा, काळूरामकाका दोधडे, प्रा. डॉ. शशिकुमार मेनन, मधुकांता दोशी आणि इतर मान्यवरांचा समावेश आहे. राजापुर तालुक्यातील नाणार येथे सुमारे 2 लाख कोटी खर्च करून उभारण्यात येणार्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवाशी एकवटले आहेत. सनदशीर मार्गाने हा प्रकल्प हद्दपार करणारच असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
काही भूमिपूत्र आंदोलनातून दूर झाले असल्याची चर्चा रंगली
बहुचर्चित रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच होणार असल्यावर आता अधिसूचनेमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. कारशिंगेवाडी, सागवे, विल्ये, दत्तवाडी, पालेकरवाडी, कात्रादेवी, कारीवणे, चौके, नाणार, उपळे, पडवे, साखर, तारळ, गोठिवरे येथील क्षेत्र या रिफायनरीसाठी संपादित करण्यात येणार आहे. 18 मे 2017 ही तारीख निश्चित करून या गावातील क्षेत्र हे औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. नाणार गावातील काही प्रमुख मंडळींनी प्रस्तावित भूसंपादला विरोध केला आहे. दरम्यान रिफायनरीविषयीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर काही लोकांनी संभाव्य प्रकल्प क्षेत्रात जमिनींची खरेदी मोठया प्रमाणावर सुरू केली आहे. भविष्यात मजबूत भरपाई मिळेल, या उद्देशाने जमिन खरेदीचे काम सुरू करण्यात आले आहे. रोख रक्कम हाती मिळत असल्याने या लोकांनी जमीन विक्रीचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे अनेक भूमिपूत्र जमिनी विकून मोकळे होत असून ते आंदोलनातून दूर झाले असल्याची चर्चा देखील सुरू आहे. यामुळे प्रकल्पविरोधी आंदोलनाला कितपत जोर येणार, याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात अनेक लोकांना फौजदारी प्रकरणांना समोर जावे लागले. आंदोलनानंतर न्यायालयात खेपा मारणे, हे अनेकांना नकोसे वाटते. लोकांना तसा अनुभव आपल्या परिसरात येऊ नये, म्हणून सविनय आंदोलन करावे, अशा सूचना आल्याने हे आंदोलन आझाद मैदानावर सुरु झाले आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची धडपड
जगभरातील सर्वात मोठा प्रकल्प नाणार-कुंभवडे या गावांच्या परिसरात होणार आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या नेमक्या काय अडचणी आहेत. या प्रकल्पामुळे त्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा. त्याचप्रमाणे त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी ग्रामस्थांच्या भेटी घेणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले होते. जर हा प्रकल्प होणार असेल तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा. त्यासाठी याच जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकासाअंतर्गत आयआयटी तसेच येथील शिक्षणसंस्थांत कोर्सेस उभे राहावेत अशा सूचना कंपन्यांना करणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले होते. तर दुसरीकडे हा प्रकल्प उभारण्यासच रामदास कदम, खा. विनायक राऊत, दादाजी भुसे यांनी स्पष्ट विरोध दर्शविला होता.
2200 कुटुंबे विस्थापित होणार
या रिफायनरी प्रकल्पामुळे पाच गावांतील सुमारे 2200 कुटुंबे विस्थापित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचे काय करणार हे स्पष्ट करावे अशी भूमिका मांडली होती. शिवसेना खासदार विनायक राऊत तसेच आमदार राजन साळवी यांनी हा प्रकल्प प्रदूषणविरहित असेल तर हा प्रकल्प उभा करणार्या इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी ग्रामस्थांना ते पटवून द्यावे. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. रिफायनरीमुळे कोणत्याही परिस्थितीत ग्रामस्थांवर अन्याय होऊ देणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. आता प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे या प्रकल्पासाठी नवा काही निर्णय घेतला जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिवसेनेची दुटप्पी भूमिका
कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरी विरोधात स्थानिकांनी मुंबईत आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेनेच्या आमदारांनी पाठिंबा दर्शवला. शिवसेनेकडे केंद्रात मंत्रीपद, राज्यातील उद्योग मंत्रीपद, पर्यावरण मंत्रीपद आहे. कोकणात रिफायनरी प्रकल्प आणण्याचा पुढाकार शिवसेनेचाच आहे. तरिही प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात शिवसेना सामील होऊन गावकर्यांना फसवू पाहते आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टीका केली आहे.