नवी दिल्ली । तीन भागीदारांच्या साथीने रिया मनी ट्रान्सफरने भारतात प्रवेश केला असल्याची माहिती रियाचे अध्यक्ष युआन बियान्ची यांनी दिली आहे. युरोनेट वर्ल्डवाइड इंकची उपकंपनी आणि जगातील तिसरी मोठी निधी हस्तांतरण कंपनी असलेल्या रिया मनी ट्रान्सफरने भारतात आपल्या व्यवसायाच्या मुहूर्तमेढीची घोषणा केली आहे. वाइजमान फॉरेक्स लि., पॉल मर्चंट्स लि. आणि ट्रान्सकॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड या आघाडीच्या चलन विनिमय क्षेत्रातील कंपन्यांबरोबर भागीदारीतून रियाचा भारतात व्यावसायिक पसारा वाढवणार आहे.
या विस्तारासाठी रियाने निवडलेल्या तिन्ही भागीदारांकडे या व्यवसायातील 15 वर्षांचा अनुभव आहे. त्यांचा हा अनुभव आणि स्थानिक बाजारपेठेची जाण याचा आपल्या व्यवसायाला निश्चितच मोठा फायदा होईल, असे या प्रसंगी बोलताना रिया मनी ट्रान्सफरचे मुख्याधिकारी आणि अध्यक्ष युआन बियान्ची यांनी म्हटले आहे. रियाने आपल्या जागतिक मोहिमेची सुरुवात म्हणून नवीन गोल्ड स्टँडर्ड नावाची सेवा सुरू केली आहे, ज्यामध्ये विदेशातून प्रेषित निधीच्या भारतातील लाभार्थीला शुद्ध सोने पारितोषिक म्हणून मिळवण्याची संधी मिळणार आहे.