नगरपरिषदकडून नाही घेतली परवानगी
चाकण : चाकण शहरातून जाणार्या जुन्या पुणे-नाशिक रस्त्यालगत रिलायन्स जीओ कंपनीच्या केबल लाईनसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात येत आहे. संबंधित खोदकाम करणार्या ठेकेदार मंडळींनी चाकण नगरपरिषदेकडून परवानगी घेतल्याचा दावा केला असून नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी मात्र संबंधित कंपनीला खोदकाम करण्यासाठी कसलीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चाकणमधील रिलायन्स कंपनीकडून पूर्वीप्रमाणेच खोदकाम परवानगीचा गोंधळ घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सिमेंटचा रस्ता फोडला
मागील आठवड्याभरापासून शहरात माणिक चौक ते मार्केटयार्ड दरम्यान अनेक ठिकाणी खोदकामात सिमेंटचा रस्ता फोडण्यात आला आहे. दिवसरात्र काम करून रिलायन्स जिओ कंपनीने जमिनीखालील पाण्याच्या लाईन, बीएसएनएलच्या केबल, विजेच्या केबल याचा कसलाही आढावा न घेता खोदकाम केल्याबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. शक्य असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या कडेने तर काही ठकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून अनधिकृतपणे केबल लाईनचे खोदकाम सुरू आहे. ऑप्टिकल फायबर नेटवर्कसाठी खोदकाम करण्याकरिता रिलायन्स जिओ कंपनीने कोणतीही परवानगी स्थानिक नगरपरिषदेकडून घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विनापरवाना खोदकाम होत असताना संबंधित ठेकदार मात्र चाकण नगरपरिषदेकडून परवानगी घेतल्याचा दावा करीत आहेत.
खोदकाम थांबविण्याचे आदेश
चाकणच्या मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांनी सांगितले की, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने शहरात सुरु केलेल्या खोदकामाच्या बाबत कुठलीही परवानगी नगरपरिषदेकडून घेतलेली नाही. संबंधित कंपनीकडे या बाबत विचारणा केली असता नगरपरिषदेत रक्कम भरल्याचे त्यांनी सांगितले. मात्र संबंधित रक्कम कशासाठी भरली, कधी भरली, याचा काहीही तपशील नसल्याने त्यांना तत्काळ काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतची सर्व कागदपत्रे घेऊन सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत कोणताही खुलासा अथवा लेखी म्हणणे कंपनीच्यावतीने अद्याप पर्यंत सादर केले गेलेले नाही.