मुंबई: रिलायन्स जिओने ग्राहकांना दुसरा दणका दिला असून, रिलायन्स जिओ फायबर वापरकर्त्यांना बसला आहे. जिओ फायबर युजर्सना आता फ्री ब्रॉड बँड सेवा मिळणार नाही. कंपनीने आपल्या ब्रॉडबँड सेवेसाठी दर आकारण्यास सुरूवात केली आहे. यासोबतच कंपनीने जिओ फायबरची सेवा आधीपासूनच वापरणाऱ्या ग्राहकांनाही टॅरिफ प्लॅन निवडण्यास सांगितले आहे. अन्यथा सेवा बंद होईल असंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय. अधिक नफा मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
याबाबत एका इंग्लिश दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो शहरांतील जिओ फायबरचे ग्राहक ज्यांनी 2500 रुपये डिपॉझीट दिलंय त्यांच्याकडून आता पैसे आकारले जात आहे. तसंच येत्या काही आठवड्यांमध्ये देशभरात कमर्शिअल बिलिंगची सुरूवात केली जाणार आहे. कंपनीकडून आपल्या 5 लाख जिओ फायबर युजर्सना टॅरिफ प्लॅन्स मध्ये शिफ्ट केलं जात आहे, म्हणजेच त्यांच्याकडून आता दर आकारले जाणार आहेत. ही प्रक्रिया पुढील एका महिन्यापर्यंत पूर्ण होईल. तसंच ‘ट्रायल’ सेवा वापरणाऱ्यांनाही मोफत ऐवजी ‘टॅरिफ प्लॅन्स’चा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. अन्यथा सेवा बंद केली जाईल असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सर्वात स्वस्त प्लॅन 699 रुपये प्रतिमहिना, तर सर्वात महागडा प्लॅन 8,499 रुपये प्रतिमहिना. या प्लॅन्समध्ये युजर्सना 100Mbps ते 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळतो. यामध्ये गेमिंग, होम नेटवर्क शेअरिंग, टीव्ही व्हिडिओ कॉलिंग आणि कॉन्फर्सिंगसह डिव्हाइस सिक्युरिटी आणि ओटीटी कंटेंट प्लॅटफॉर्म यांसारख्या सेवा वापरता येतात.