सभापती अमोल शेटेंची कारवाईची मागणी
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत रिलायन्स जिओ ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याच्या खोदाई कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या कामाची संपूर्ण चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नगरपरिषदेच्या नियोजन समिती सभापती अमोल शेटे यांनी लेखी निवेदनाव्दारे केल्यामुळे सत्ताधारी पक्षाबरोबरच नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. तळेगाव शहरात रिलायन्स जिओ ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याच्या खोदाई काम सध्या वेगाने चालू आहे.रस्ते खोदाईच्या कामासाठी नगर परिषदेने एकून 3 कोटी दोन लाख कंपनीकडून भरून घेतले आहे. त्यामध्ये 1 कोटी 23 लाख हि अनामत रक्कम आहे.
2 कोटींचे नुकसान व भ्रष्टाचार
शहरातील एकूण सहा मुख्य रस्त्याचे साडेसहा किलोमीटर लांब खोदाई काम करण्यात येणार आहे. या खोदाई कामामुळे डांबरीकरण केलेले चांगले रस्ते खोदले जात आहे.तसेच रस्या खालील पाण्याचे नळजोड, सांडपाण्याची गटारे,टेलिफोनच्या लाईन खोदल्या व तुटल्या जात आहेत. यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगर पालिका प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे शेटे यांनी निवेदनात म्हटले आहे. तर नगर परिषदेने या खोदाई कामाबाबत कमी दर लाऊन व कमी अनामत रक्कम घेऊन दुमारे दोन कोटी रुपयाचे नुकसान व तेवाढच भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप शेटे यांनी निवेदनात केला आहे.
सभापतींनीच केली पोलखोल
तळेगावातील नागरिकांना खोदाई कामाच्या दरा बाबतच्या रकमे बाबत वेगळा न्याय व कंपनीला वेगळा न्याय असा प्रकार नगरपरिषदेकडून केला जात असल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सभापतींनी नगर परिषदेतील भ्रष्टाचाराच्या बाबत पोलखोल केल्याने नागरिकाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रिलायन्स जिओ ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याच्या खोदाई कामा वरून जानेवारी महिन्यात झालेली नगर परिषदेची विशेष स्थायी समिती सभा मुख्याधिकारी आवारे यांना जाब विचारून स्थगित करण्यात आली होती. मात्र या विषयाकडे प्रशासनाने संपूर्ण दुर्लक्ष करून काम चालू ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निवेदनाची दाखल न घेतल्यास शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल असा इशारा शेटे यांनी दिला आहे.