रिव्हॉल्वरसह 9 जणांना अटक

0

मुळशी । पेट्रोलपंपावर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणार्‍या 9 जणांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने अटक केली. कोयते, रिव्हॉल्वरसारख्या घातक शस्त्रांसह आढळलेल्या या टोळक्यामध्ये मुळशीच्या टोळीयुद्धातील एका गुंडाचा समावेश असून एका लोकप्रतिधीचा खून करण्यासाठी पैसे जमा करण्यासाठी ते पेट्रोलपंपावर दरोडा घालणार होते.

उमेश वाघुलकर (माण), योगेश गुरव (कर्वे रस्ता), योगेश वेताळ, विशाल वेताळ, विशाल कळसकर (तिघेही रा. शिरूर), चंद्रकांत थापा (कासारवाडी), फिरोज आयुब खान (दळवीनगर), अन्वर मुलाणी (रावेत), आकाश रेणुसे (वेल्हा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे 5 पिस्तूल, 1 रिव्हॉल्वर, 28 राऊंड, 5 कोयते सापडले. दोन चारचाकी आणि दोन दुचाकीही त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. वाघुलकर याने सर्वांना जमा केले असून माण येथे राहणारे उपसभापती पांडुरंग वझरकर यांच्याशी असलेल्या भांडणांमुळे तो त्यांना ठार करण्याच्या प्रयत्नात होता. त्यांना संपविल्यानंतर या टोळक्यातील प्रत्येकाला तो 2 लाख रुपये देणार होता. ही रक्कम जमा करण्यासाठीच तो लक्ष्मी पेट्रोलपंपावर दरोडा घालणार होता. गुरव हा कुख्यात शरद मोहोळ टोळीचा सदस्य असून तो सध्या गणेश मारणे याच्या खूनप्रकरणी शिक्षा भोगत होता. मे महिन्यात तो 30 दिवसांच्या पॅरोलवर सुटला, तेव्हापासूनच तो फरार होता.