रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सिनेस्टाईल दरोडा

0

नंदुरबार: शहरातील गणपती मंदिर परिसरात गावठी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सुमारे 12 लाख रुपयांची रक्कम पळविल्याची घटना बुधवारी अगदी सकाळी घडली. घडलेल्या थरार दरोड्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सकाळी शहरातील गजबजलेल्या भरवस्तीत सशस्त्र दरोडा पडल्याने नागरिकांसह व्यापार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या दरोड्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. त्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

सविस्तर असे, येथील गणपती मंदीराच्या मागील बाजूस देवेंद्र जैन या व्यापार्‍याचे डी.सी.डेव्हलपर्स कार्यालय आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान कार्यालयातील कर्मचारी साफसफाई करीत होता. याचवेळी कार्यालयात दोन सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून धुमाकूळ घातला. गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून तेथील कर्मचार्‍याला बांधून ठेवत सुमारे 12 लाखाची रोकड लंपास करण्यात दरोडेखोर यशस्वी झाले. सकाळच्यावेळी गजबजलेल्या वस्तीत दरोडा पडल्याने व्यापार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. तथापी या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नंदुरबारातील बांधकाम व्यावसायिक देवेद्र जैन यांचे गणपती मंदिरामागील भागात मुख्य रस्त्यावर डी.सी. डेव्हलपर्स हे कार्यालय आहे. या ठिकाणाहून त्यांचे आर्थिक व्यवहार चालतात. 19 रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास हा सिनेस्टाईल दरोडा पडला. सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवत तेथील कर्मचार्‍याला बांधून ठेवले. तसेच कार्यालयातील 10 ते 12 लाखाची रक्कम घेऊन दोघांनी तेथून पोबारा केला. बांधलेल्या कर्मचार्‍याने कशीबशी सुटका करून आरडाओरड केल्यानंतर घटना उघडकीस आली.

घटनास्थळी श्वान पथक दाखल
यावेळी तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस अधीक्षक महेद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर नवले, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने मागील बाजुच्या रस्त्यापर्यंत मार्ग दाखविला. पोलिसांनी कार्यालयातील तसेच परिसरातील दुकानांबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. एकंदरीत या दरोड्यात कार्यालयातील कर्मचार्‍याचा समावेश आहे का या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. त्याचा धागा मिळताच त्या दोन्ही दरोडेखोर पकडले जातील, अशी अपेक्षा पोलिसांना आहे. याशिवाय शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या डीएसके कॉम्पलेक्समध्येही असाच प्रयत्न झाल्याचे समजते. मात्र, त्याबद्दल काहीच माहिती मिळू शकली नाही.