रीक्षा चालकाच्या मृत्यू प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा

0

हिंगणे फाट्यावर अपघात ; पसार कंटेनर चालकास मुक्ताईनगरजवळ पकडले

बोदवड- मुक्ताईनगर येथून बोदवडकडे येणार्‍या अ‍ॅपे रीक्षाला हिंगणे फाट्याजवळ बुधवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ट्रेलरने धडक दिल्याने रीक्षा चालक रवींद्र हिरामण मोरे (45, तांदलवाडी, ह.मु.पिंप्रीअकराऊत) हे ठार झाले होते तर अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाल्यानंतर त्यास मुक्ताईनगरजवळ पकडण्यात आले. या प्रकरणी गुरुवारी कंटेनर चालकाविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातानंतर कंटेनर चालक पसार
तांदलवाडी (ता.रावेर) येथील मूळ रहिवासी व सध्या प्रिंंपी अकाराउत (ता.मुक्ताईनगर) येथे वास्तव्यास असलेले रवींद्र मोरे हे अ‍ॅपे रीक्षा (क्रमांक एम.एच.19 बी.व्ही.1604) ने बुधवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास बोदवडकडे येत असताना समोरून येणार्‍या कंटेनर (क्रमांक एम.एच.20 ईजी 8942) ने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता तर भाजीपाला व्यापारी पंडीत सीताराम माळी (54, पिंप्रीअकराऊत) हे जखमी झाले होते. या अपघात प्रकरणी विनोद सगुना सोनवणे (पिंप्री अकराऊत, ता.मुक्ताईनगर) यांनी गुरुवारी बोदवड पोलिसात फिर्याद दिल्यावरून कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मयत रवींद्र मोरे यांच्यावर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. दरम्यान, अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनर चालकाला मुक्ताईनगराजवळ पोलिसांनी पकडले असून तो औरंगाबादचा रहिवासी असल्याचे समजते.