यावल : यावल तालुक्यातील रीधोरी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने हरीणाचा पाय फॅक्चर झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. रीधोरी ग्रामपंचायत सरपंच, सर्पमित्र, वन कर्मचारी यांच्या दक्षतेने हरीणावर फैजपूरातील पशू वैद्यकीय अधिकार्यांनी तातडीने उपचार केले.
जखमी हरीणावर तातडीने उपचार
रीधोरीतील सर्पमित्र किशोर सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी रीधोरी ग्रामपंचायत सरपंच नंदकिशोर सोनवणे हे आपल्या कामानिमित्त बाहेरगावी जात असताना त्यांना रीधोरी गावाजवळ रस्त्याच्या बाजूला एक हरीण जखमी अवस्थेत दिसून आल्यानंतर त्यांनी सर्पमित्र किशोर सोनवणे माहिती दिली. या दोघांसह वनक्षेत्रपाल विक्रम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रवींद्र तायडे, वाहन चालक सचिन चव्हाण, वनपाल तुकाराम येवले तसेच खिर्डी येथील सर्पमित्र शाखाप्रमुख अजय कोळी यांनी जखमी हरीणाला तात्काळ फैजपूर येथील पशुपक्षी वैद्यकीय दवाखान्यात हलवत त्याच्यावर उपचार केले. हरीण सध्या यावल वन विभागात वन कर्मचारी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.