रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षांसह 25 जणांविरुद्ध गुन्हा

0

झोपडपट्टी धारकांवर खोटे गुन्हे -रिपाई आठवले गटाचे निवेदन ; आरोप निराधार -राजू सूर्यवंशी

भुसावळ- कंडारी शिवारातील शिवारातील गट क्रमांक 159/1/2 मधील न्यायप्रविष्ट जागेवर बेकायदा शिरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी, प्रकाश निकम यांच्यासह 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सुनील रमेश अग्रवाल (रा.एस.के ऑईल मिलजवळ) यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली.

बेकायदेशीरपणे गेट तोडून 50 हजारांचे नुकसान
तक्रारदार सुनील अग्रवाल यांच्या फिर्यादीनुसार आजी सुशीलाबाई किसनलाल अग्रवाल नावाने चॅरीटेबल ट्रस्ट सुरू केले असून हॉस्पीटल, महाविद्यालय व विद्यालयासाठी कंडारी शिवारातील शेत गट क्रमांक 159/1/2 ही साडेपाच एकर जागा आपल्या नावावर असून गट क्रमांक 159 वर पूर्वीपासून किसनलाल ऑईल मिलदेखील आहेत. 2010 पासून जागा आपल्या ताब्यात असून तीन हजार 300 रुपये प्रमाणे ग्रामपंचायतीला भाडे अदा केले जात आहे. या जागेसंदर्भात न्यायालयात खटला न्यायप्रविष्ट असून जागा आहे तशीच ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत मात्र मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी तथा आरपीआय जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी, प्रकाश निकम हे जेसीबीसह 25-30 महिला व पुरुषांना घेऊन त्यांनी गेटचे कुलूप तोडत आत अनधिकृतपणे प्रवेश केला. 40 वर्षांपूर्वीची निलगिरीची दोन व कडुनिंबाचे एक झाड तोडून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान केले तसेच आपल्यावर अंगावर जेसीबी चढवून तुम्हाला ठार मारू अशी धमकी सूर्यवंशी यांनी दिल्याचा आरोप अग्रवाल यांनी फिर्यादीत केला आहे. बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी धाव घेत तातडीने सूर्यवंशी यांना रोखले. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.

झोपडपट्टी धारकांवर खोटे गुन्हे -रिपाई आठवले गटाचे निवेदन
रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांचे पुर्नवसन करण्यासाठी कंडारी शिवारातील ग्रामपंचायतीच्या 159/1/2 या जागेची स्वच्छता करताना सुनील रमेशचंद्र अग्रवाल यांनी खोट्या व बनावट कागदपपत्रांद्वारे आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्याविरुद्ध तसेच झोपडपट्टी धारकांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर भादंवि 420 व कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याने अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटातर्फे प्रांताधिकार्‍यांना करण्यात आली. निवेदनावर रमेश मकासरे, रिपाइं खा.प्र.अध्यक्ष लक्ष्मण जाधव, रावेर लोकसभा अध्यक्ष सुदाम सोनवणे, जिल्हा सचिव प्रकाश सोनवणे, राजू डोंगरदिवे, विश्‍वास खरात, मनोहर सुरळकर, शरद सोनवणे, दिलीप परलवाल, युसूफ भाई, बाळू सोनवणे, रॉकी चाबुकस्वार, गौरखनाथ सुरवाडे, बंडू देशमुख, दिलीप मोरे, फरीद खान आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.