रीपाइं ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशींसह आठ जणांची हद्दपारी रद्द

महसुल आयुक्तांनी हद्दपारीचे आदेश ठरवले रद्द : सूर्यवंशी यांची भुसावळात स्वागत

भुसावळ : शहरातील पंधरा बंगला भागातील रहिवासी व रीपाइंचे (आठवले गट) ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू भागवत सूर्यवंशी व सोबतच्या 8 जणांना पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. या आदेशाविरूद्ध सूर्यवंशी यांनी महसूल आयुक्तांकडे (नाशिक) अपिल दाखल केले होते. त्यावर निर्णय होत राजू सूर्यवंशीसह आठ जणांच्या हद्दपारीचे पोलीस अधीक्षकांनी काढलेले आदेश महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रद्द ठरवल्याने सूर्यवंशी यांनी मोठा दिलासा मिळाला. गुरुवारी सूर्यवंशी हे शहरात दाखल झाले आहेत.

या आठ जणांची हद्दपारी झाली रद्द
राजू सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, रोहन राजू सूर्यवंशी, शेख इम्रान शेख गुलाम रसूल, किशोर भागवत सूर्यवंशी, कैलास भागवत सूर्यवंशी, आनंद भागवत सूर्यवंशी आणि हर्षल कैलास सोनार (सर्व रा.भुसावळ) यांना पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी 18 ऑगस्ट 2021 रोजी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. या आदेशाविरूद्ध सूर्यवंशी यांनी नाशिक येथे महसूल आयुक्तांकडे अपिल दाखल केले. त्या अपिलावर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी पोलीस अधीक्षकांनी काढलेले हद्दपारीचे आदेश आदेश रद्द केले. त्याची प्रत सूर्यवंशी यांना प्राप्त झाली. ही प्रत त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिली. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. तेथे मला न्याय मिळाल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. सूर्यवंशीसह आठही जण गुरुवारी भुसावळात घरी परतल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले.