प्रांताधिकार्यांचे आदेश नाशिक आयुक्तांनी ठरवले रद्द
भुसावळ- रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांना 3 एप्रिल रोजी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी आदेश काढल्यानंतर पोलिसांनी त्याची अंमलबजावणी केली होती मात्र या निर्णयाविरुद्ध नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्याकडे दाद मागितल्यानंतर 2 जुलै रोजी माने यांनी प्रांताधिकार्यांचा हद्दपारीचा आदेश रद्द ठरवल्याने सूर्यवंशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजकीय दबावाने हद्दपारीची कारवाई -सूर्यवंशी
नाशिक विभागीय आयुक्तांच्या निकालानंतर राजू सूर्यवंशी म्हणाले की, आपल्याविरुद्ध राजकीय दबावतंत्र वापरून कारवाई करण्यात आली. दलित समाजात आपली आर्थिक, राजकीय व सामाजिक पकड असून आगामी विधानसभा निवडणुकीत आपण दावेदार असल्याने ही कारवाई करण्यात आली होती मात्र या संदर्भात नाशिक आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली असून चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले आहेत.