रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशीसह आठ जणांची टोळी दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने खळबळ : आगामी काळात अनेकांची होणार हद्दपारी
भुसावळ : भुसावळातील रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू भागवत सूर्यवंशी यांच्यासह आठ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याबाबत मंगळवार, 17 रोजी आदेश काढल्याने भुसावळात प्रचंड खळबळ उडाली आहे. हद्दपारीच्या आदेशाची संबंधिताना अंमलबजावणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांची झाली शहरातून हद्दपारी
रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू भागवत सूर्यवंशी यांच्यासह दीपक भागवत सूर्यवंशी, रोहन राजू सूर्यवंशी, हर्षल कैलास सोनार (रा.संभाजी नगर, भुसावळ) शेख इम्रान शेख (पंधरा बंगला, भुसावळ), किशोर भागवत सूर्यवंशी, कैलास उर्फ छोटू भागवत सूर्यवंशी, आनंद भागवत सूर्यवंशी (तिन्ही रा.प्रल्हाद नगर, भुसावळ) या आठ जणांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी आदेश काढल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी लागलची आदेशाची अंमलबजावणी केली. दोन दिवसानंतर संबंधित सांगतील त्या ठिकाणी त्यांना सोडण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बाजारपेठ पोलिसांनी सादर केला प्रस्ताव
तत्कालीन प्रभारी अधिकारी अर्चित चांडक, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत आदींनी संबंधिताना हद्दपार करण्यासंदर्भात पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाची चौकशी करून संबंधिताच्या हद्दपारीबाबत मंगळवारी आदेश काढले.
टोळीविरोधात अनेक गुन्हे
राजू सूर्यवंशी यांच्यासह अन्य आठ जणांविरोधात गैरकायद्याची मंडळी जमवून दंगे करणे, प्राणघातक हत्यार जवळ बाळगून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, शरीराविरोधात दुखापतीचे गुन्हे करणे, जमाव बंदी आदेशाचे उल्लंघण करणे तसेच सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल असल्याने बाजारपेठ पोलिसांनी उभयंतांना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान, आगामी काळात आणखी काही जण हद्दपार होणार असल्याचे कारवाईच्या आदेशाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.