रीपाइं संघटन मजबूत करून आगामी निवडणुकांना सामोरे जा
केंद्रीय मंत्री रामदास आठवले ः भुसावळातील आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
भुसावळ : जळगाव जिल्हा दौर्यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भुसावळातील रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष व माजी सभापती राजू सूर्यवंशी व विद्यमान नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी यांच्या भुसावळातील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सूर्यवंशी परीवारातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. रीपाइं संघटन मजबूत करून आगामी निवडणुकांना सामोरे जावे, असे यावेळी हितगुज करताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले.
आगामी निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा
याप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राजू सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली तसेच भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यातील एकूण राजकीय व सामाजिक परीस्थितीचा आढावा घेतला. आगामी नगरपालिका, जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह रीपाइंच्या जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा केली. जळगाव जिल्ह्यात रीपाइंचे संघटन बळकट करून सर्व निवडणुकांना पूर्ण ताकदीनिशी कार्यकर्त्यांनी सामोरे गेले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. जळगाव जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी केलेल्या विविध कामांची माहिती घेत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून जिल्ह्यातील पक्ष वाढीबाबत समाधान व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी रीपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रीपाइं युवा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रवी सपकाळे, युवा कार्याध्यक्ष गिरीश तायडे, लक्ष्मण जाधव, शरद सोनवणे प्रकाश तायडे, अरुण गजरे, पप्पू सुरडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी व परीसरातील नागरिक उपस्थित होते.